![]()
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी येथील पालखी रथाची बैलजोडी हिंगोलीच्या साजाने सजणार असून या बैलजोडीसाठी आवश्यक असलेला साज आळंदी येथे संस्थानकडे सूपुर्द करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून पालखी सोहळे विट्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जातात. लाखो वारकरी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन तृप्त होता. हरिनामाचा गजर करीत निघालेल्या पालखी सोहळा, दिंडी यामुळे संपूर्ण वातावरण धार्मिक होते. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची मुक्कमाच्या ठिकाणी भोजनासह पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा केली जाते. या शिवाय पालखी मार्गावर ठिकठिकाणी चहा, पाणी, नाश्ता दिला जातो. दानशूरांकडून सुमारे एक महिनापेक्षा अधिक कालावधीसाठी वारकऱ्यांची सेवा केली जाते. दरम्यान, हिंगोली येथील भांड्याचे व्यापारी राहुल कानडे यांनी आळंदी येथून निघाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा रथ वाहून नेणाऱ्या बैलजोडीला साज देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी बैलजोडीच्या साजाचे संपूर्ण साहित्य तयार केले. यामध्ये पितळी मोरक्या, पितळी कासरा घेण्यात आला असून रिसोड येथील देवराव रंजवे या कारागिराने हाताने कासरा तयार करून दिला आहे. त्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचा मोबदला घेतला नाही. सेवा म्हणून त्यांनी हाताने कासरा तयार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुमारे ८ ते १० फुट लांबीचा कासरा तयार करण्यासाठी त्यांना सुमारे १० ते १५ दिवसांचा कालावधी लागला आहे. त्यासाठी लागणारे साहित्य राहुल कानडे यांनी उपलब्ध करून दिले. दरम्यान, बैलजोडीच्या साजाचे साहित्य नुकतेच आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्याकडे सुपूर्द केले. या निमित्त राहुल कानडे यांचा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
Source link
माऊलींच्या पालखी रथाला हिंगोलीचा साज:बैलजोडी आळंदीत सजणार, वारकरी सोहळ्याची जय्यत तयारी