![]()
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव बुद्रुक येथील ज्येष्ठ नागरिक कस्तुराबाई शंकरराव मानकर यांचे १५ ऑगस्ट रोजी निधन झाले. मृत्यूनंतरही आपले शरीर समाजाच्या आणि वैद्यकीय क्षेत्राच्या उपयोगी पडावे, या उदात्त विचाराने त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी त्यांचे देहदान केले. या निर्णयामुळे मानकर कुटुंबीयांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. कस्तुराबाई मानकर यांनी हयात असतानाच श्री जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या संस्थेकडे देहदानाचा संकल्प नोंदवला होता. त्यांच्या निधनानंतर संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रफुल धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. त्यांचे पार्थिव डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय (पीडीएमएमसी) येथे वैद्यकीय शिक्षणासाठी दान करण्यात आले. या देहदानामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानवी शरीरावर संशोधन करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. तसेच, त्यांच्या नेत्रदानामुळे दोन गरजू व्यक्तींना नवीन दृष्टी मिळण्यास मदत होईल आणि शरीरातील इतर अवयवदेखील इतरांसाठी संजीवनी ठरू शकतील. मानकर कुटुंबीयांनी घेतलेल्या या धाडसी आणि सामाजिक निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगी दिवंगत कस्तुराबाई यांचे सुपुत्र श्रीकृष्ण, सून उज्वला, मुलगी शोभाताई तसेच इतर कुटुंबीय उपस्थित होते.
Source link
गावंडगावच्या कस्तुराबाई मानकर यांचे देहदान:वैद्यकीय शिक्षणासाठी कुटुंबीयांनी घेतला आदर्श निर्णय