![]()
देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी तंत्रज्ञानापुरते मर्यादित न राहता समाजाभिमुख, सर्वसमावेशक आणि व्यापक नवोन्मेष (इनोव्हेशन) आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एमकेसीएल) संस्थापक संचालक विवेक सावंत यांनी व्यक्त केले. ज्ञानप्रबोधिनीच्या अटल सामाजिक नवोन्मेष केंद्राच्या (एसीआयसी) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नीती आयोग, अटल इनोव्हेशन मिशन, देसाई ब्रदर्स लिमिटेड आणि ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र उभारण्यात आले आहे. विवेक सावंत यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी अटल इनोव्हेशन मिशनचे अधिकारी आशिष पांडे व दीपाक्षी जिंदल, देसाई ब्रदर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश पारेख, सीएसआर हेड डॉ. चंद्रकांत रावळ, ज्ञान प्रबोधिनीचे विश्वस्त सुभाष देशपांडे, निगडी केंद्राचे प्रमुख मनोज देवळेकर, ‘एसीआयसी’चे संस्थापक संचालक यशवंत लिमये व संगीता कुलकर्णी, तसेच मुख्य नवोपक्रम अधिकारी ॐकार गुर्जर उपस्थित होते. सावंत यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण भाग, महिला, स्वयं-सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि तळागाळातील उद्योजकांना सक्षम करणारी नवोन्मेषाची परिसंस्था उभारणे ही काळाची गरज आहे. भारताची लोकसंख्या, कौशल्य आणि स्थानिक समस्यांचे स्वरूप पाहता सामाजिक नवोन्मेषाला मोठी संधी आहे. समाजाचे प्रश्न सोडवण्यावर भर देताना त्यातून नाविन्यपूर्ण उपाय कसे शोधता येतील, यावर संशोधन व्हायला हवे. शिक्षण, उद्योग, संशोधन संस्था आणि समाज यांनी एकत्रितपणे काम केल्यास रोजगारनिर्मिती, उद्योजकता आणि शाश्वत विकासाला गती मिळेल. तंत्रज्ञानाचा वापर समाजातील प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधण्यासाठी झाला, तर त्याचा व्यापक परिणाम देशाच्या आर्थिक प्रगतीवर होईल, असेही सावंत यांनी नमूद केले. यावेळी अटल इनोव्हेशन मिशनचे अधिकारी आशिष पांडे म्हणाले की, ज्ञान प्रबोधिनी हे अटल सामाजिक नवोन्मेष केंद्र (एसीआयसी) सुरू करणारे पुण्यातील पहिले केंद्र आहे. देशभरात अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत सुमारे २५ एसीआयसी केंद्रे कार्यरत असून, त्यापैकी हे केंद्र ग्रामीण आणि तळागाळातील समाजघटकांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. ज्ञान प्रबोधिनीचे शेतकरी, महिला बचत गट, ग्रामीण नागरिक आणि स्थानिक उद्योजक यांच्याशी आधीपासूनच मजबूत जाळे असल्याने हे केंद्र योग्य ठिकाणी उभारल्याचे समाधान आहे. या केंद्राला देशातील सर्वोत्तम सामाजिक नवोन्मेष केंद्र बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे पांडे यांनी सांगितले. दीपाक्षी जिंदल यांनी नमूद केले की, या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नवकल्पनांना चालना मिळेल, रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होतील. तसेच नवोन्मेषाची संस्कृती शालेय वयापासूनच रुजावी, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उद्योजकीय विचार विकसित करण्यावरही विशेष भर दिला जाईल. ज्ञान प्रबोधिनीचे हे केंद्र महाराष्ट्रातील सामाजिक नवोन्मेषासाठी एक प्रभावी मॉडेल ठरेल.
Source link
ज्ञानप्रबोधिनीच्या अटल सामाजिक नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन:शाश्वत विकासासाठी व्यापक इनोव्हेशन गरजेचे – विवेक सावंत