Headlines

फुलेवाड्यातील पूजेवरून वाद:खासदार मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करा, शरद पवार गटाची मागणी; पुरातत्व विभागाला पत्र




राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महात्मा फुले यांच्या वाड्यात विनापरवानगी वटपौर्णिमा साजरी केल्याप्रकरणी ही मागणी करण्यात आली आहे. तसेच, शनिवारवाड्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती तसेच संविधान दिन यांसारखे कार्यक्रम करण्यास परवानगी देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालय, पुणे विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहाने आणि केंद्रीय पुरातत्व विभाग, पुणेचे वरिष्ठ संरक्षक सहायक गजानन मंडावरे यांना दिले आहे. माने यांनी पत्रात म्हटले आहे की, भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि काही महिलांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या गंज पेठेतील ऐतिहासिक फुलेवाड्यात वटवृक्षाची पारंपरिक पूजा केली. फुलेवाडा हे राज्य संरक्षित स्मारक असल्याने तेथे कोणतेही धार्मिक कार्यक्रम होऊ नयेत, असा प्रघात आहे. मात्र, खासदार कुलकर्णी यांनी हा प्रघात मोडून महिलांसोबत पूजा केली. माने यांनी पुरातत्व विभागाला विचारले आहे की, या पूजेसाठी परवानगी दिली होती का? दिली असल्यास, ती कोणत्या नियमाने दिली याची माहिती द्यावी. परवानगी दिली नसल्यास, विनापरवानगी धार्मिक विधी केल्याबद्दल खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुनील माने यांनी डॉ. विलास वाहाने यांच्याकडे केली आहे. याच पत्रात, सुनील माने यांनी शनिवारवाड्याबाबतही मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातून स्वराज्य निर्माण झाले आणि स्वराज्याच्या पैशांवर पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा बांधण्यात आला. ही वास्तू सध्या केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची समाधी शोधणारे महात्मा फुले, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच संविधान दिन हे सर्व शासकीय आणि सामाजिक दिवस आहेत. समाजात आणि शासकीय पातळीवरही हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. त्यामुळे हे कार्यक्रम शनिवारवाड्याच्या आत साजरे करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी केंद्रीय पुरातत्व विभाग, पुणेचे वरिष्ठ संरक्षक सहायक गजानन मंडावरे यांच्याकडे केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *