![]()
रिसोड पोलिस ठाण्याच्या कोठडीत १५ वर्षापूर्वी एका तरुणाच्या मृत्यू प्रकरणात वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला. जिल्हा न्यायमूर्ती जयसिंग झपाटे यांनी तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जन्मठेप ठोठावली.
.
केवळ ३४ दिवसांत तपास पूर्ण करत सीआयडीने दोषारोपपत्र सादर केले होते. त्यानुसार दोषींना कलम ३०२ अन्वये जन्मठेप, कलम २०१ नुसार पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न या गुन्ह्याखाली ७ वर्षे कैद व ॲट्रॉसिटी अंतर्गत ५ वर्षे कैद सुनावली. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील बेग्या पवार व राजू पवार या दोघांना रिसोड पोलिसांनी ९ मे २०११ रोजी चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. १० मे रोजी कोठडीत त्याचा मृत्यू झाला. तर राजू पवार गंभीर जखमी झाला होता.
४२ फ्रॅक्चरचा अहवाल, जबाब ठरले निर्णायक
बेग्या यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव व ४२ फ्रॅक्चरचा शवविच्छेदन अहवाल, एकूण ४७ साक्षीदारांचे जबाबांच्या आधारे न्यायालयाने तत्कालीन पोलीस निरीक्षक महादेव धांडे, मदन पवार, शिवाजी खिल्लारी, पंजाब पाटकर, रमेश पवार, प्रकाश तारम, नागोराव खांडके, अशोक वैद्य व वसंत जाधव यांना जन्मठेप सुनावली.
एकही गुन्हा नसताना पारधी समाजाचा म्हणून मारले
बेग्याविरुद्ध एकही गुन्हा दाखल नव्हता. केवळ पारधी समाजाचा म्हणून पोलिसांनी त्याला अटक करत मारले. अखेर उशिरा का होईना, पण आमच्या पोटच्या गोळ्याला न्याय मिळाला, अशी भावना मृत बेग्या पवार यांचे वडील नयनू पवार आणि आई कलाबाई यांनी व्यक्त केली.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्युप्रकरणी खटल्याकडे लक्ष
डिसेंबर २०२४ मध्ये परभणी येथील पोलिस कोठडीत नांदेडच्या सोमनाथ सूर्यवंशी याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने गंभीर दखल घेतली असून, सीआयडीमार्फत तपास सुरू आहे. यात ७२ पोलिसांच्या भूमिकेवर सवाल आहे.
कोठडीतील मृत्यूबाबत महाराष्ट्र देशात दुसरा
एनसीआरबी अहवाल २०२४ नुसार, देशातील एकूण ६५ कोठडीतील मृत्यूंपैकी महाराष्ट्रात १६ मृत्यू झाले आहेत. यात ६ मृत्यू पोलिस किंवा न्यायालयीन कोठडीत, तर १० मृत्यू कोठडी मिळण्यापूर्वी चौकशी दरम्यान झाले. पोलिस कोठडीतील मृत्यूंच्या बाबतीत देशात गुजरात (१२ मृत्यू) नंतर महाराष्ट्र (६ मृत्यू) दुसऱ्या क्रमांकावर आहे.