Headlines

स्मार्ट मीटर मोहीम थांबवून जुने मीटर लावा:‘प्रहार’ची विद्युत भवनवर धडक, अभियंता देवहाते यांना विविध मागण्यांसाठी घातले साकडे‎




महावितरण कंपनीकडून घराघरांत बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरमुळे कामगार, शेतकरी व सर्वसामान्य वीज ग्राहकांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे नवे मीटर काढून जुनेच मीटर लावून द्या, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे. या मागणीसाठी आज, गुरुवारी महावितरणचे मुख्यालय असलेल्या कॅम्प स्थित विद्युत भवनसमोर प्रचंड निदर्शने करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांना निवेदन सोपवत त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. प्रहार सामाजिक संघटनेचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, महानगरप्रमुख बंटी रामटेके, हॉकर्स युनियनचे गणेश मारोटकर, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोरव ठाकरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनानुसार, अल्प उत्पन्नावर उदरनिर्वाह करणाऱ्या कामगार व शेतकरी वर्गाला स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिलांचा फटका बसत आहे. पूर्वी कमी रकमेची वीजबिले येत असताना स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांना जादा रकमेच्या बिलांचा सामना करावा लागत असल्याचा प्रहारचा दावा आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर अन्याय होत असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी महावितरण प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम तात्काळ थांबवून जुन्या मीटरची व्यवस्था कायम ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी भूमिकादेखील संघटनेने घेतली असल्याचे प्रशासनाला सांगण्यात आले. दरम्यान या मागण्या मान्य न झाल्यास कामगार व शेतकरी मोठ्या संख्येने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनात प्रहार सामाजिक संघटनेचे विशाल दंडगव्हाळ, संपर्कप्रमुख गोलू पाटील, जिल्हा महासचिव शेख अकबर, संघटक श्याम इंगळे, कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष देवाशीष मते, सुरक्षा रक्षक युनियनचे शुभम झळके, सचिव विनय जायले, उपाध्यक्ष जय हिवरकर, इतर पदाधिकारी समीर तायडे, विशाल आघडे, प्रकाश देशमुख, मुकेश घुंडायाल, शेषराव धुळे आदी सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *