Headlines

आता एमपीएससी ऑनलाइन नको:ऑफलाइनच घेण्याची केली मागणी, विद्यार्थ्यांचा जिल्हाकचेरीवर मोर्चा, शासनाला घातले साकडे‎




महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) आगामी पूर्व परीक्षा संगणकाधारित (सीबीटी) पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, हा निर्णय बदलून परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक ऑफलाईन (ओएमआर) पद्धतीने घेण्यात यावी, या मागणीसाठी सदर परीक्षेची तयारी करणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत तेथे निदर्शने केली. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकारी यांना निवेदनही सादर केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना संगणकाधारित परीक्षा पद्धतीमुळे तांत्रिक व इतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे संगणक हाताळण्याचा पुरेसा अनुभव नाही. तसेच ग्रामीण भागात इंटरनेटचा संथ वेग, तांत्रिक बिघाड आणि वीज पुरवठ्याची समस्या यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभरातील विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेचा सराव करत आहेत. अचानक परीक्षा पद्धतीत बदल केल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि ‘समान संधी’च्या तत्त्वावर विपरीत परिणाम होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आंदोलनात सुयोग राजनकर, पंकज बैस, भारत खातकर, आदित्य मिसाळ, स्नेहा चौधरी, प्राची बावनेर, गायत्री जाधव, यशस्वी माटे, भूमी टोंगे, पायल खंडेलवाल, ओम इंगळे, गौरी इंगळे, अर्पीता मेहरे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *