Headlines

'मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा!':हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलकांचा संताप




हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांकडे पालकमंत्र्यांनी पाठ फिरविल्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी सोमवारी ता. १७ जिल्हाधिकारी यांच्या दलना समोर येऊन प्रचंड घोषणाबाजी केली. आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी कार्यालय दणाणून केले होते. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हिंगोली शहरातील रिसाला बाजार येथील मातंग समाजाच्या स्मशानभुमीसमोरील अतिक्रमण हटवावे, ॲट्रॉसीटी कायद्यांतर्गत पिडीतांना दिले जाणारे अनुदान तातडीने वाटप करावे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या परिसरातील अतिक्रमण हटवावे, कळमनुरी येथे स्मशानभुमीच्या कामांसाठी मंजूर झालेल्या १ कोटी ३२ लाखांच्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी यासह इतर मागण्यांंसाठी लहूजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी ता. १५ पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या सर्वच आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणे तसेच अडचणी जाणून घेणे अपेक्षीत होते. मात्र पालकमंत्री झिरवाळ यांनी यावेळी एकाही आंदोलनाला भेट दिली नाही शिवाय चर्चाही केली नाही. या आंदोलनाकडे पाठफिरवून पालकमंत्री झिरवाळ यांनी काढता पाय घेतला होता. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी पालकमंत्री झिरवाळ यांच्या कार्यपध्दतीचा निषेध केला. त्यानंतर सोमवारी दुपारी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून त्यांच्या दलनासमोरच घोषणाबाजी सुरु केली. या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घोषणाबाजी करीत आंदोलकांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या कक्षात जाऊन निवेदन दिले. यावर जिल्हाधिकारी गुप्ता यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, त्यानंतरही आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर ठाण मांडले. सायंकाळी उशीरा पर्यंत आंदोलनकर्त्यांनी आंदोलन सुरुच ठेवले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *