![]()
राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणाची सखोल, निःपक्ष, वेळेत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. होतकरू, हुशार विद्यार्थ्यांच्या जीवनाची राखरांगोळी करू पाहणाऱ्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत गेले आहेत, अशा राक्षसी वृत्तीच्या लोकांवर कोणाचा वरदहस्त आहे, याची चौकशी झाली पाहिजे. हे वादळ उग्ररूप धारण करण्यापूर्वी शासनाने या लोकांचा बंदोबस्त करावा. त्यांच्या सर्व मालमत्ता जप्त कराव्यात. विद्यार्थ्यांच्या पालकांना लुबाडून, विद्यार्थ्यांची दिशाभूल करून उभे केलेले काळे साम्राज्य नेस्तनाबूत करावे. राज्यातील टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे वर्षभर मेहनत घेऊन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाला आहे. परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकता व विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद आहे. यातील सर्व दोषी अधिकारी, संबंधित दलाल, जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. चौकशी निःपक्ष, सखोल, निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावी. प्रामाणिकपणे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये. यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. पेपरफुटीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर पर्यायी व्यवस्था जाहीर करावी. अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मूर्तिजापूर शाखाध्यक्ष प्रा. दीपक जोशी, नगर मंत्री सिद्धेश जोशी, प्रेम गुप्ता, आदित्य तिवारी, यशवंत हरसुले, दीप साबळे, सार्थक हरिहर यांच्यासह विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Source link
टीईटी पेपरफुटी प्रकरणाची निःपक्ष चौकशी कर:अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर