![]()
जे ढग गरजत असतात ते बरसत नाही. उद्धव ठाकरे यांनी आधी आपल्या स्वतःच्या पक्षाकडे लक्ष दिले पाहिजे आणि तो सांभाळण्याचे काम केले पाहिजे. त्यांनी उगाच राम मंदिराच्या बाबतीत उठाठेव करू नये, अशा शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. आम्ही श्रीराम जन्मस्थानावर भव्य राम मंदिर उभे केले असून, त्यासंदर्भात आलेल्या तक्रारींची चौकशी सरकारकडून अत्यंत पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचे भातखळकर यांनी स्पष्ट केले. राम मंदिर दान पेटी गैरव्यवहार प्रकरणावर स्पष्टीकरण देताना भातखळकर म्हणाले की, उत्तर प्रदेश सरकारने केवळ संशयावरून आणि एका आरोपामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे. विशेष म्हणजे, श्रीराम मंदिर ट्रस्टने स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने सुरू असून आम्हाला काहीही लपवायचे नाही. जो कोणी दोषी आढळेल, त्याला कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल. कोरोना काळात स्वतःचे सरकार असताना जे कड्या लावून घरात बसले होते, त्यांनी राम मंदिरावर न बोललेलेच बरे, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला. अधिकाऱ्यांवर कारवाई केली मुंबईत मुसळधार पावसामुळे झालेल्या दोन नागरिकांच्या मृत्यूवर भातखळकर यांनी दुःख व्यक्त केले. हे मृत्यू अत्यंत दुर्दैवी असून प्रशासनाने आधीच मार्गदर्शक सूचना दिल्या असतानाही ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. पालिकेचा कुठलाही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे सांगतानाच, निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांचा जीव गेला असून, दोषी अधिकाऱ्यांवर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आपण सभागृहात लावून धरल्याचे भातखळकर यांनी सांगितले. दरम्यान, सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर पुढे काय होते ते पहा, असे म्हणत त्यांनी एक सूचक विधानही केले. ..तर चेंबूरप्रमाणेच थेट कारवाई दुसरीकडे, मुंबईतील दुर्घटनांवरून महापौर रितू तावडे यांनी पालिकेच्या संबंधित वॉर्ड अधिकारी आणि अभियंत्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही वॉर्ड अधिकारी आणि संबंधित अभियंत्यांची अत्यंत गंभीर चूक आहे. ऐन भर पावसात अशी कामे हाती घेण्याची काहीच गरज नव्हती, असे स्पष्ट करत तावडे यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला. जर अधिकारी अशाच प्रकारे निष्काळजीपणा करत राहिले, तर चेंबूरप्रमाणेच त्यांच्यावरही थेट कठोर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा कडक इशारा महापौरांनी दिला आहे. संबंधित वृत्त वाचा साकीनाका मॅनहोल दुर्घटनेत मोठा खुलासा:सुरक्षिततेसाठी मॅनहोल उघडला, पण नियमच पाळले नाहीत; पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची कबुली
साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर मुंबई महापालिका प्रशासनाने मोठा खुलासा केला आहे. ही दुर्घटना मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी जाळी बसविण्याचे काम सुरू असतानाच घडली, मात्र कामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करण्यात आले नाही, अशी कबुलीच मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेने संबंधित चार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. वाचा सविस्तर
Source link
जे ढग गरजत असतात ते बरसत नाही:आधी स्वतःचा पक्ष सांभाळा, मग उठाठेव करा, राम मंदिराच्या मुद्द्यावरून भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात