![]()
देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथे येथे मंदिराच्या परिसरात उघड्यावर पेढा विक्री करणाऱ्या 7 दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकून तब्बल 1 क्विंटल पेढा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे औंढ्यात एकच खळबळ उडाली आहे. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे दररोज सुमारे 5 ते 10 हजार भाविक नागनाथाच्या दर्शनासाठी येतात. या शिवाय महाशिवरात्री, श्रावण महिन्यात भाविकांची संख्या मोठी असते. भाविक प्रसादासाठी पेढा, बेलफुले खरेदी करतात. बहुतांश दुकानांमधून प्रसादासाठी उपलब्ध केलेला पेढा घरीच तयार केला जातो. दरम्यान, मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हिंगोली व परभणी जिल्हयात गुटखा, तंबाखू विक्रीच्या दुकानांवर छापे टाकून कारवाईचे सत्र सुरु केले आहे. या शिवाय मिठाई विक्रीची दुकाने तसेच काही किराणा दुकानांवरची छापे टाकून खाद्य पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त पी. एम. खताळ यांच्यासह अन्न व औषध निरीक्षक तुषार घोपे, राजश्री सावंत यांच्या पथकाने औंढा नागनाथ मंदिराच्या बाजूला असलेल्या मिठाई विक्रीच्या दुकानांवर तपासणी सुरु केली. यामध्ये अधिकाऱ्यांच्या पथकाने सात दुकानांमध्ये तपासणी केली असता त्या ठिकाणी पेढा उघड्यावर ठेवण्यात आल्याचे दिसून आले. या शिवाय पेढा कोठून आणला, त्याच्या पावत्या कुठे आहेत याची माहिती दुकानदारांना देता आली नाही. त्यामुळे या सात दुकानांमधून 1 क्विंटल पेढा जप्त केला आहे. सदर पेढा नष्ट करण्यात आला आहे. या पुढे मिठाई विक्री करतांना कोठून खरेदी केला, त्याच्या पावत्या सोबत ठेवाव्यात तसेच दुकानामध्ये स्वच्छता ठेवण्या्च्या सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.
Source link
औंढा नागनाथ मंदिर परिसरात 'FDA'चा मोठा छापा:उघड्यावरील 1 क्विंटल पेढा जप्त करून केला नष्ट