![]()
लाखो मुंबईकरांची ‘लाईफलाईन’ असलेल्या लोकल ट्रेनमध्ये वाढत्या गुन्हेगारी आणि किरकोळ कारणांवरून होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, त्यांच्यात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर समस्येची दखल घेत आमदार रवींद्र फाटक यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मुंबई शहर आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना मांडली. ज्यावर उत्तर देताना राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. योगेश कदम म्हणाले, मुंबईसह राज्यातील रेल्वे स्थानके आणि रेल्वे परिसरातील प्रवाशांच्या सुरक्षिततेत सर्वोच्च प्राधान्य देत संवेदनशील ठिकाणांसाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. रेल्वे पोलिस स्थानिक पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त कारवाईद्वारे गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई केली जाईल. पुढे बोलताना योगेश कदम, रेल्वे अपघात आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी संवेदनशील झोन निश्चित करण्यात आले असून प्रत्येक झोनसाठी संयुक्त पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल शासनाला सादर करतील. त्यानुसार तातडीने आवश्यक निर्णय घेतले जातील. रेल्वेतील वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या फेऱ्या आणि डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे राज्य शासनामार्फत पाठपुराव्याने मांडली जाईल. महिला डब्यात असलेल्या सुरक्षेच्या वेळेत वाढ मुंबई लोकलमध्ये महिलांच्या विनयभंगाच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. याबाबत काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर महिला डब्यात असलेल्या सुरक्षेच्या वेळेत वाढ करण्यात येईल, अशी घोषणा योगेश कदम यांनी केली आहे. ते म्हणाले, महिलांच्या सुरक्षिततेसाठी रात्री 9 ते सकाळी 6 या कालावधीत उपलब्ध असलेली विशेष सुरक्षा सुविधा सकलाई 8 वाजेपर्यंत काढण्याबाबत आलेल्या सूचनेचा सकारात्मक विचार करून आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल तसेच रेल्वे स्थानके आणि प्लॅटफॉर्मवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती मुक्तपणे वावरत असल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिस आणि रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त पथकांमार्फत सर्व प्रमुख स्थानकांवर विशेष मोहीम राबवून अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्यात येणार असून रेल्वे स्थानकांवर फेस रेकग्निशन तंत्रज्ञानयुक्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल. तसेच रेल्वे डब्यांमधील सुरक्षाव्यवस्थेचाही आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधला जाईल, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली आहे.
Source link
मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या वेळेत वाढ:विशेष कृती आराखडा तयार, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा