![]()
अकोला सध्याच्या बदलत्या हवामानात संत्रा व मोसंबी बागांच्या मृग बहाराचे व्यवस्थापन करणे फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. मृग बहार पावसाळ्यातील योग्य हवामान व तापमानावर अवलंबून असतो. या बहारात रोग व किडींचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असल्याने फळगळ कमी होते. मात्र, यावर्षी विदर्भात किमान साडेतीन महिने कडक उन्हाळ्यामुळे बागांना अधिक ताण बसला. यामुळे बागांमध्ये फुलगळ किंवा फळगळ होण्याची दाट शक्यता आहे, असे कृषीतज्ञांनी सांगितले. मृग बहारात फुलोरा येऊन फळे टिकून राहण्यासाठी जास्तीत जास्त ३५ अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. ६५ टक्क्यांहून अधिक आर्द्रता व महिन्यात १५० ते २२५ मिलीमीटर विखुरलेला पाऊस आवश्यक असते. जून-जुलै दरम्यान पावसाचा खंड पडल्यास किंवा हवामान उष्ण व दमट राहिल्यास मावा, सायला, फुलकिडे व कोळी आदी रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वेगाने वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बागेची नियमित पाहणी करून योग्य वेळी उपाययोजना करावी. संत्रा व मोसंबी उत्पादकांनी सुरूवातीच्या काळातच तीव्र कीटकनाशके किंवा बुरशीनाशके वारंवार वापरणे टाळावे. यामुळे किडींमध्ये त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होणार नाही. या शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब केल्यास मृग बहाराचे यशस्वी व्यवस्थापन करून शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतील. वाळलेली सल काढणे: ज्या बागा अजून फुटलेल्या नाहीत त्यांनी ताणामुळे किंवा रोगामुळे आलेली वाळलेली सल काढावी आणि ती बागेबाहेर नेऊन जाळून नष्ट करावी. त्यानंतर झाडांवर कॉपर ऑक्सीक्लोराइड (३०० ग्रॅम) किंवा कार्बनडाझिमची (१०० ग्रॅम) फवारणी करावी. न फुटलेल्या बागांची फुलगळ थांबवण्यासाठी चिलेटेड स्वरुपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये (झिंक, बोरॉन) २ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारावीत. कुजलेल्या शेणखतासोबत पीएसबी, अझोस्पिरीलियम, ट्रायकोडर्मा आणि रासायनिक खतांचा (नत्र २७० ग्रॅम, स्फुरद १२० ग्रॅम, पालाश ३० ग्रॅम प्रति झाड) पहिला हप्ता पालवी फुटताना द्यावा. ज्यांच्या बागेत कळी अडकली, त्यांनी जिबरेलिक ॲसिड (१५ पीपीएम) सोबत पोटॅशियम नायट्रेट किंवा युरिया आणि प्रोपीकोनाझोल किंवा कार्बनडाझिम मिसळून फवारणी करावी. ज्या भागात पाऊस कमी झाला असेल किंवा बागेत डोळे फुगलेले दिसत असतील, त्यांनी बागेला त्वरित पाणी सुरू करावे. पावसाचा खंड पडल्यास सूक्ष्म सिंचन, गांडूळ खत आणि हिरवळीचे खत देऊन बागेत थंडावा व ओलावा टिकवून ठेवावा आणि सर्व झाडांच्या खोडांना १० टक्के बोर्डो मलम लावावा. या सर्व प्रक्रीयेचा निश्चितपणे मोठा असा फायदा होतो, असेही त्यांनी यादरम्यान सांगितले. फुलाचे फळात रुपांतर झाल्यावरच फवारणी ^यंदा तीन ते साडेतीन महिने उन्हाळ्यामुळे बागेला भरपूर ताण बसला. त्यामुळे फुलोरा अधिक फुटून फुलगळ अथवा फळगळीची शक्यता आहे. झाडांमध्ये अशक्तपणा आल्यास कळी अडकते. शेतकऱ्यांनी फवारणी करताना सरसकट फवारणी करू नये. शक्यतो फुलोरा धरण्याअगोदर, नेमकी कळी दिसत असताना किंवा फुलाचे फळात रूपांतर झाल्यावरच फवारणी करावी. एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य आणि कीड व रोग नियंत्रण करावे. – डॉ. दिनेश पैठणकर , कृषीतज्ञ, पीडीकेव्ही, अकोला.
Source link
संत्रा, मोसंबी मृग बहार; अधिक ताणाने फुलगळीचा धोका:तीव्र उन्हाळ्यामुळे झाडांना अधिक ताण