![]()
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी जीडीपी वाढवणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी ज्ञानाधारित अर्थव्यवस्था विकसित करावी लागेल, असे मत भारताच्या नवनिर्मिती परिसंस्थेचे शिल्पकार व एआयसीटीईचे माजी उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी व्यक्त केले. एस.ए.ई. इंडियाच्या पश्चिम विभागातर्फे आयोजित ‘स्टुडंट्स कन्व्हेन्शन २०२५-२६’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम एआयएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडला. यावेळी व्यासपीठावर एस.ए.ई. इंडियाच्या पश्चिम विभागाचे चेअरमन आणि एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई, एस.ए.ई. इंडियाच्या पश्चिम विभागाचे सचिव केशव ताम्हणकर, एआयएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एस. बोरमाने, कार्यक्रमाचे निमंत्रक प्रा. डॉ. अविनाश वाघमारे (मेकॅनिकल विभाग, एआयएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय) आणि एस.ए.ई. इंडियाच्या पश्चिम विभागाचे सहसंचालक मोहन पाटील उपस्थित होते. डॉ. जेरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, औद्योगिक क्षेत्राच्या बदलत्या गरजा पाहता ‘चलता है’ हा दृष्टिकोन सोडून व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारणे महत्त्वाचे आहे. भारत अभियंते घडवण्यात चीनलाही मागे टाकत आहे, ही तरुणाई आपली ताकद आहे. मात्र, या तरुणांमध्ये उद्योग क्षेत्राला अपेक्षित कौशल्यांची कमतरता असल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या अभियंत्यांमध्ये रोजगारक्षमतेचा अभाव दिसतो. ते पुढे म्हणाले की, आता ‘रट्टा मारून’ शिक्षण घेण्याची वेळ राहिलेली नाही. विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता आत्मसात करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानामुळे आव्हाने निर्माण झाली असली तरी, त्याचबरोबर अनेक संधीही उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर करून स्वतःला सिद्ध करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. रेजी मथाई यांनी वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली. यावर योग्य पर्याय शोधण्याची गरज असून, भविष्यातील या समस्येवर मात करण्यासाठी औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन काम करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Source link
ज्ञानाधारीत अर्थव्यवस्था विकसित करावी लागेल:डॉ. अभय जेरे यांचे ‘स्टुडंट्स कन्व्हेन्शन’मध्ये प्रतिपादन