![]()
श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथे सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, १५ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ही कामे अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या निधीतून हाती घेण्यात आली आहेत. पुरातत्त्व विभागामार्फत ही दुरुस्ती व संवर्धनाची कामे मागील तीन महिन्यांपासून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासह संपूर्ण परिसरात प्रगतीपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर, देवस्थान समितीने मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा ठराव मंजूर केला आहे. पुणे विभागाच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनीही या ठरावाला मान्यता देत संबंधित आदेश जारी केले आहेत. मंदिर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. बांधकामाशी संबंधित यंत्रणा, अधिकृत अधिकारी, कर्मचारी आणि विश्वस्त यांच्याशिवाय अन्य कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिर बंद असले तरी, श्री महागणपतींची नित्य पूजा, अभिषेक आणि इतर धार्मिक विधी नियमितपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे धार्मिक परंपरा अखंडितपणे सुरू राहतील. मंदिर प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की, मंदिराची दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि सुव्यवस्थेसाठी ही विकासकामे अत्यंत आवश्यक आहेत. कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. पुरातत्त्व विभाग, देवस्थान ट्रस्ट, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानेही नागरिकांना संयम ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Source link
रांजणगाव महागणपती मंदिर 3 महिने बंद राहणार:जतन व संवर्धन कामांमुळे 15 एप्रिल ते 31जुलै 2026 पर्यंत भाविकांना प्रवेश नाही