![]()
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, ज्ञानाची आवड निर्माण व्हावी तसेच स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक प्रगतीस चालना मिळावी या उद्देशाने पैठण तालुक्यातील आडूळ येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्रशालेत रविवारी सुसज्ज ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. या नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार विलास भुमरे यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले. पुस्तके हीच खरी ज्ञानाची संपत्ती असून ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहावे असे त्यांनी सांगितले. ग्रंथालयामध्ये शालेय अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षा, विज्ञान, साहित्य, इतिहास, चरित्रे, सामान्य ज्ञान आणि विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तवार, पंचायत समिती सदस्य कासाबाई कोल्हे, तात्यासाहेब नलावडे, सरपंच बबन भावले, उपसरपंच भाऊसाहेब पिवळ, माजी सरपंच रुस्तुम वाघ, माजी पंचायत समिती सदस्य विजय वाघ, मार्केट कमिटीचे माजी सभापती विलास गोरे, बद्रीनारायण भुमरे, शिंदेंसेनेच्या महिला तालुका प्रमुख ज्योती पठाडे, माजी उपसरपंच शेख जाहेर, ग्रा पं सदस्य मोहसीन तांबोळी केंद्रप्रमुख रामेश्वर भगत, मुख्याध्यापिका ज्योती मादनकर, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तवार यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शाळेसाठी वर्गखोल्याची कमतरता असल्याने नवीन इमारत लवकरच उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार विलास भुमरे यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.
Source link
आडूळ जि. प. शाळेत ग्रंथालयाचे उद्घाटन:विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहावे- आमदार भुमरे