![]()
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे रविवारी सकाळी शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याने शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, या बिबट्याला जेरबंद करण्याच्या मोहिमेत माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. वनविभागाने बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध केल्यानंतर, स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील आणि जमावाने त्याला काठीने अमानुष मारहाण केल्याचा आरोप होत असून, यावरून आता राजकीय संघर्ष पेटला आहे. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या दिसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी वनविभाग आणि पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला भूल देणारे ‘डार्ट’ मारले. डार्ट लागल्याने बिबट्याला ग्लानी आली. मात्र, याच वेळी स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील आणि तिथे उपस्थित असलेल्या जमावाने हातात लाकडी दांडके घेऊन बिबट्यावर तडाखे ओढले. या झटापटीत आमदार चंद्रकांत पाटील हे देखील जखमी झाले. मात्र, जमावाने केलेल्या मारहाणीत बिबट्या गंभीर जखमी झाला असून, या अमानुष कृत्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘खडसे विरुद्ध पाटील’ : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदारांच्या वागणुकीवर कडाडून टीका केली आहे. “बिबट्याला आधीच बेशुद्धीचे इंजेक्शन दिलेले असताना त्याला अशा प्रकारे मारहाण करणे हे नियमबाह्य आणि गुन्हा आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधींनी असे वागणे चुकीचे आहे. जर शुद्धीत असलेल्या बिबट्याला पकडले असते, तर त्यांचे कौतुक केले असते,” अशा शब्दांत खडसेंनी टोला लगावला. आमदार चंद्रकांत पाटलांचा पलटवार या आरोपांना उत्तर देताना आमदार पाटील म्हणाले की, “बिबट्या एका व्यक्तीवर हल्ला करण्याच्या तयारीत होता, म्हणून त्याला रोखण्यासाठी काठीचा वापर करावा लागला. खडसे हे केवळ ‘पोटदुखीचे’ राजकारण करत असून त्यांची विचारसरणी विकृत आहे.” वनविभागाच्या भूमिकेकडे लक्ष वनविभागाने सध्या बिबट्याला ताब्यात घेतले असून त्याला सुरक्षित अधिवासात सोडण्याची तयारी सुरू आहे. मात्र, बेशुद्ध प्राण्याला मारहाण करणे हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हा मानला जातो. अशा परिस्थितीत, प्रत्यक्षदर्शी पुरावे आणि व्हिडिओ समोर आल्यावर वनविभाग आमदार आणि जमावावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
आमदार चंद्रकांत पाटलांकडून बेशुद्ध बिबट्याला काठीने मारहाण:वन्य प्राण्याला मारणे नियमबाह्य आणि गुन्हा म्हणत एकनाथ खडसेंची टीका