![]()
चांदूरबाजार तालुक्यातील पांढरी गावातील दोन व्यक्ती चारगड नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यूमुखी पडल्याची घटना २९ जूनला घडली. या घटनेमुळे पांढरी गावावर शोककळा पसरली असून, चारगड नाल्यावर तातडीने उंच पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अन्यथा ये
.
शिरजगाव कसबा मंडळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मेघा नदीसह सर्व नाले दुथडी भरून वाहत होते. अशा परिस्थितीत पांढरी येथील रहिवासी रवींद्र राम आवारे आणि गोपाल वासुदेव निर्वार हे दोघे २९ जूनला रात्री सुमारे दहा वाजताच्या सुमारास शिरजगाव कसबा येथून पायदळ पांढरीकडे निघाले होते. वाटेत लागणाऱ्या चारगड नाल्यावरील पुलावरून जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही प्रवाहात वाहून गेले. या मार्गावरून पांढरी गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी तसेच ग्रामस्थ शिरजगाव या मुख्य बाजारपेठेत ये-जा करतात. त्यामुळे पावसाळ्यात जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर येते. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उंच पुलाचे काम तातडीने मंजूर करून पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तर गोपाल निर्वार हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रविंद्र आवारे व गोपाल निर्वार हे दोघेही अतिपाऊस झाल्यामुळे २९ जूनला दुचाकी शिरजगावात ठेवून पायी गावाकडे जात होते. त्याचवेळी चारगड नाल्याच्या पुलावरुन वाहत गेले. त्यानंतर आवारे यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३० जूनला नाल्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर तर गोपाल यांचा मृतदेह २ जुलैला तब्बल २२ किलोमीटर अंतरावर सापडला होता.
आ. बच्चू कडू यांची दोन्ही कुटुंबाला सांत्वन भेट दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आमदार बच्चू कडू यांनी रविवारी (दि. ५) पांढरी गावात जावून मृत्यू झालेल्या दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थांनी आमदार बच्चू कडू यांच्यासमोर पांढरी-शिरजगाव मार्गावरील चारगड नाल्यावर तातडीने नवीन उंच पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी जोरदार मागणी केली. या मागणीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय ग्रामस्थांनी जाहीर केला.