Headlines

विधानसभेत मुख्यमंत्र्यांचे सविस्तर उत्तर:पूरमुक्तीसाठी 13 हजार कोटींचा आराखडा, कनेक्टिंग लिंकवरून टीकेवर म्हणाले- एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले!




मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी त्यांनी यंदाच्या पावसाची तीव्रता, पूरनियंत्रणासाठीचा 13 हजार कोटी रुपयांचा आराखडा, धोकादायक इमारती, झाडे कोसळण्याच्या घटना तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर भूमिका मांडली. नियम 293 अंतर्गत झालेल्या या चर्चेत एकूण 19 सदस्यांनी सहभाग घेतला. चर्चेची सुरुवात आमदार अमित साटम यांनी केली. त्यानंतर जयंत पाटील, सुनील प्रभू, मुरजी पटेल, अमिन पटेल, सना मलिक, अतुल भातखळकर, मनीषा चौधरी, चेतन तुपे, अबू आझमी यांच्यासह अनेक सदस्यांनी मुंबई आणि एमएमआरमधील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारला प्रश्न विचारले. सहा दिवसांतच जुलैच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईकरांना दरवर्षी मान्सूनमध्ये विविध आपत्तींचा सामना करावा लागतो. साधारणपणे जुलै महिन्यात कुलाबा येथे 734 मिमी आणि सांताक्रूझ येथे 856 मिमी पाऊस पडतो. मात्र यंदा केवळ सहा दिवसांतच कुलाबा येथे 882 मिमी आणि सांताक्रूझ येथे 988 मिमी पावसाची नोंद झाली. याचा अर्थ कुलाबा येथे जुलै महिन्याच्या सरासरीच्या 111 टक्के, तर सांताक्रूझ येथे 102 टक्के पाऊस अवघ्या सहा दिवसांत झाला. एवढेच नव्हे, तर केवळ चार दिवसांतच जुलै महिन्यातील सरासरी पावसाच्या जवळपास 90 टक्के पाऊस कोसळला. मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत संपूर्ण पावसाळ्यात जितका पाऊस पडतो, त्यापैकी तब्बल 42 टक्के पाऊस केवळ सहा दिवसांत पडला. तुलना करायची झाल्यास हा पाऊस दिल्लीच्या संपूर्ण पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या 117 टक्के, पुण्याच्या 113 टक्के आणि बंगळुरूच्या संपूर्ण हंगामातील पावसाच्या 96 टक्क्यांइतका आहे. मुसळधार पावसासोबत वादळी वारे आणि भरतीचाही फटका फडणवीस यांनी सांगितले की, मुसळधार पावसासोबतच 50 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे आणि जवळपास 4 मीटर उंचीची भरतीही आली होती. या तिन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्याने अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आणि काही दुर्घटनांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला. या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. धोकादायक झाडे आणि इमारतींबाबत महापालिकेला निर्देश दरवर्षी झाडे कोसळणे आणि जुन्या इमारती ढासळण्याच्या घटना घडत असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेला विशेष सूचना दिल्याचे सांगितले. विशेषतः जुन्या झाडांच्या मुळांची मजबुती कमी झाल्यास त्यांचे पुनरुज्जीवन कसे करता येईल, याचा अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. धोकादायक इमारतींबाबत बोलताना त्यांनी एका दुर्घटनेचा उल्लेख केला. संबंधित इमारत आधीच रिकामी करण्यात आली होती. मात्र शेजारच्या घरातील काही नागरिकांनी घर सोडण्यास नकार दिला आणि दुर्दैवाने तीच इमारत त्यांच्या घरावर कोसळल्याने जीवितहानी झाली, असे त्यांनी सांगितले. मुंबईच्या पूरमुक्तीसाठी 13 हजार कोटींचा आराखडा मुंबईतील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी सरकारने 13 हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा तयार केला असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले की, ‘ब्रिमस्टो’ प्रकल्पाबाबत गेली अनेक वर्षे चर्चा होत आहे. मात्र आता त्यातील प्रमुख कामे पुढील एक-दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय 13 हजार कोटी रुपयांचा स्वतंत्र पूरनियंत्रण आराखडा केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या आराखड्यांतर्गत मुंबईतील पूरस्थिती निर्माण होणारे सुमारे 370 हॉटस्पॉट दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुसळधार पाऊस आणि भरती एकाच वेळी आली तरी अशा ठिकाणी अवघ्या 30 मिनिटांत पाणी बाहेर जाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईचे पावसाचे पाणी समुद्रात जाते. मात्र भरतीच्या काळात समुद्र पाणी स्वीकारत नसल्याने पूरस्थिती निर्माण होते. नव्या आराखड्यामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि दरवर्षी मुंबईकरांना भेडसावणाऱ्या अडचणींमधून दिलासा मिळेल. कनेक्टिंग लिंकवरून विरोधकांवर टीका उत्तरादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी कनेक्टिंग लिंक प्रकल्पावरून विरोधकांवरही टीका केली. काही जण टीव्हीवर येऊन चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. महायुती सरकारने हिंमत दाखवून कनेक्टिंग लिंकसारखे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती मिळाली, असे ते म्हणाले. विरोधकांकडून या प्रकल्पांबाबत करण्यात येणारी टीका वस्तुस्थितीपासून दूर असल्याचाही दावा त्यांनी केला. ही बातमी अपडेट होत आहे…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *