Headlines

परसवानी कुटुंबाचा 14 दिवसांनी शोध, पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले:कर्जाला कंटाळून सोडले होते घर, भाड्याच्या फ्लॅटमध्ये वास्तव्य




नागपूरच्या धंतोली परिसरातून बेपत्ता झालेल्या परसवानी कुटुंबाचा शोध अखेर १४ दिवसांनी लागला आहे. हे कुटुंब पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथे एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. प्रचंड कर्ज आणि कर्जदारांच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी नागपूर सोडल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, जितेंद्र परसवानी यांच्यावर मोठे कर्ज होते. कर्जदार पैशांसाठी त्यांच्याकडे सतत तगादा लावत होते. या त्रासाला कंटाळून कुटुंबाने २४ जून रोजी सकाळी ६.३० वाजता कोणालाही न सांगता टॅक्सीने नागपूर सोडले. यात हर्षा परसवानी (५७), जितेंद्र परसवानी (४२), ईशिता परसवानी (४०), खुशी परसवानी (२१) आणि कृष्णा परसवानी (१४) यांचा समावेश होता. नागपूर सोडल्यानंतर हे कुटुंब थेट पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथे पोहोचले. तिथे त्यांच्या नातेवाईकांच्या शेजारीच त्यांनी एक भाड्याचा फ्लॅट घेतला. ओळख लपवण्यासाठी त्यांनी मोबाईल फोन बंद ठेवले होते. मात्र, कुटुंबातील एका सदस्याने ‘जी-पे’वरून केलेल्या ऑनलाइन पेमेंटमुळे पोलिसांना त्यांचे अचूक लोकेशन मिळाले. त्यानंतर नागपूर पोलिसांच्या पथकाने पिंपरी-चिंचवड गाठून १४ दिवसांनी त्यांचा शोध घेतला. धंतोली पोलिसांनी पिंपरी-चिंचवड येथे परसवानी कुटुंबाची भेट घेऊन ते सुखरूप असल्याची खात्री केली. या प्रकरणात पोलिसांची भूमिका स्पष्ट करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांची जबाबदारी केवळ कुटुंबाचा शोध घेण्यापुरती मर्यादित होती. बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल असल्याने, कुटुंब सुरक्षित आहे की नाही हे तपासणे ही पोलिसांची कायदेशीर जबाबदारी होती, जी पूर्ण झाली आहे. कुटुंबातील १४ वर्षांच्या मुलाव्यतिरिक्त इतर सर्व सदस्य सज्ञान आहेत. कर्जाच्या त्रासाला कंटाळून ते स्वतःच्या मर्जीने नागपूर सोडून गेले आहेत. त्यामुळे त्यांना जबरदस्तीने नागपुरात परत आणणे ही पोलिसांची जबाबदारी नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *