![]()
ग्रामीण भागातील प्रवाशांची वाढती मागणी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या प्रयत्नांमुळे वैजापूर तालुक्यातील पानगव्हाण ग्रामस्थांचे अनेक दशकांचे स्वप्न साकार झाले आहे. पानगव्हाण गावातून ७ जुलै रोजी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बसची अधिकृत फेरी सुरू झाली. ७८ वर्षांनंतर गावात लालपरीचे आगमन झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले. गावातून थेट बस सेवा सुरू झाल्यामुळे पानगव्हाण येथून वैजापूर येथे विविध कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांची आणि उच्च शिक्षणासाठी धावणाऱ्या विद्यार्थ्यांची दररोजची पायपीट थांबली आहे. १,२३३ लोकसंख्या असलेल्या पानगव्हाण गावात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा उपलब्ध आहे. मात्र, पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना खंडाळा किंवा वैजापूर शहराशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. गावात सार्वजनिक वाहतुकीची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना रोज सायकलने किंवा पायपीट करत प्रवास करावा लागत असे. या दळणवळणाच्या गंभीर समस्येमुळे अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. भविष्यात नवीन पिढीचे असे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून पानगव्हाण येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पुढाकार घेत बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. गावात पहिल्यांदाच बस आल्याने ग्रामस्थांनीलालपरीचे स्वागत केले. बसचे चालक व वाहक यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सोहळ्याला एसटी महामंडळाचे वाहतूक सहाय्यक गोपाल पगारे, सरपंच मंदाबाई घायवट, उपसरपंच योगिता घायवट, बाळासाहेब घायवट, गजानन घायवट, नरेंद्र मस्के, अशोक बोरडे, संतोष घायवट, त्र्यंबक घायवट, राजाराम शिंदे, शिवाजी पठारे, सुनील कटारे आदींसह मोठ्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. दिवसातून रोज दोन फेऱ्या; असे असेल वेळापत्रक एसटी महामंडळाने पानगव्हाण ग्रामस्थांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बसच्या दररोज दोन फेऱ्या सुरू केल्या आहेत. यामध्ये सकाळी ठीक ८.०० वाजता पहिली फेरी होईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेज गाठणे सोपे होईल. तर दुसरी फेरी दुपारी ४.०० वाजता असेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळे सुटल्यानंतर गावात परतणे सोयीचे होणार आहे. गावात प्रथमच बस फेऱ्या सुरू झाल्यामुळे पानगव्हाणचा शहराशी थेट संपर्क येईल. गावाची प्रगती वेगाने होण्यास मदत होईल, असे अशोक बोरडे यांनी सांगितले.
Source link
पानगव्हाणला ग्रामस्थांकडून एसटी बसचे स्वागत:78 वर्षांनंतर गावात पहिल्यादाच महामंडळाच्या लालपरीचे आगमन