Headlines

राज्यात पावसाचा जोर ओसरला:विदर्भाला विश्रांती! तरीही पुणे-साताऱ्यासह 17 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट




गेले चार दिवस संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आज थोडा कमी झाला आहे. सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आज पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी, धोका मात्र पूर्णपणे टळलेला नाही. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील १७ जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा कायम ठेवला असून, यामध्ये २ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ तर १५ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भाला विश्रांती, पावसाची उघडीप हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या ९ जिल्ह्यांमध्ये पावसाची कोणतीही शक्यता नाही. येथे पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. केवळ चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज असून तेथे ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पुणे-सातारा घाटमाथ्यावर आजही ‘ऑरेंज अलर्ट’ राज्यात पावसाचा जोर सर्वसाधारणपणे कमी झाला असला तरी, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर मात्र वरुणराजाची कृपादृष्टी कायम राहणार आहे. पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथा परिसरामध्ये आज अतिमुसळधार पावसाचा धोका कायम असल्याने या दोन्ही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, कोल्हापूरच्या घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरच्या मैदानी भागात आज केवळ हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात परिस्थिती काय? मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या कोकण पट्ट्यातील ५ जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर थोडा कमी असला तरी, जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने येथे ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर, सिंधुदुर्गमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्येही आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने येथेही हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ लागू केला आहे. मराठवाड्याचा विचार केल्यास, तिथे आज मोठ्या पावसाचा इशारा नसून अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. प्रशासनाचा नागरिकांना महत्त्वाचा इशारा आज पावसाचा जोर ओसरला असला तरी, गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नद्या आणि नाले अजूनही भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी आणि सखल भागातील नागरिकांनी गाफील राहू नये. हवामान विभागाच्या ‘अलर्ट’कडे दुर्लक्ष न करता, अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. हेही वाचा.. यूपी-बिहारमध्ये वीज पडून 3 जणांचा मृत्यू: एमपीमध्ये तरुण नदीत वाहून गेला; सुरतमध्ये पुरामुळे 3 दिवसांत 19 जणांचा बळी गेला
मध्य प्रदेशात बुधवारी 27 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस दमोहमध्ये 1.75 इंच झाला. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. खरगोनमध्ये रूपारेल नदीच्या जोरदार प्रवाहात एका तरुणाचा मृत्यू झाला. राजस्थानमधील अलवरमध्ये बुधवारी जोरदार पावसामुळे बाजारातील रस्ते पाण्याखाली गेले. जिल्हा रुग्णालय परिसर आणि सरकारी शाळेत पाणी साचले. बिहारमधील गोपालगंजमध्ये वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. 4 जण भाजले आहेत. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *