![]()
शहरातील नमूना गल्ली क्र. ५, काळे हॉस्पीटलजवळ असलेल्या घरातील सिलिंडरला भीषण आग लागल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. विशेष बाब अशी की, वरच्या मजल्यावर ही आग लागली तेथे विद्यार्थी राहात होते. बरे घरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अरुंद असल्याने अग्निशमन विभागाला आगीपर्यंत पोहोचणे सहज शक्य होत नसल्याने जवानांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर अग्नीशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत सिलिंडरचा कॉक बंद केला. त्यासह आणखी एक अतिरिक्त सिलिंडरही बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परिसरातील नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास घेतला. अग्निशमन विभागाला मंगळवारी ७ जुलैला सायंकाळी ६.५० वाजता आग लागल्याची माहिती पुष्पा देशमुख यांनी दिली. त्यानंतर चार मिनिटांनी अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले. सुमारे एक तास प्रयत्न केल्यानंतर अग्निशमन विभागाला रात्री ८ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. पुष्पा देशमुख यांनी अग्निशमन मुख्यालय नियंत्रण कक्षाला फोन द्वारे माहिती दिली की, नमुना गल्ली नंबर ५ मध्ये घरात सिलिंडरला आग लागली आहे. अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे व शिफ्ट इन्चार्ज सुनील काकडे यांच्या आदेशानुसार अग्निशमन वाहन चालक नितीन इंगोले, फायरमन अमोल साळुंखे, राजेश गजबे तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळावर पोहोचल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की ही आग पुष्पा देशमुख यांच्या घरातील वरच्या खोलींमध्ये विद्यार्थी राहत असलेल्या ठिकाणी लागली आहे. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ होजरिल होजच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, निमुळता मार्ग असल्यामुळे उष्णता, धूर व आगीच्या ज्वाळांमुळे कर्मचाऱ्यांना आग विजवण्यास अडथळा येत होता. अरुंद मार्ग व रस्त्यात वाहनांच्या अडचणीमुळे अग्निशमन मुख्यालयातून अतिरिक्त मदत पाठवण्यात आली. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळाले. आग कमी झाल्यावर एलपीजी गॅस सिलिंडरशी शेगडीला जोडलेले रेग्युलेटर बंद करून सिलिंडर बाहेर काढण्यात आले. या आगीमध्ये दोन्ही एलपीजी गॅस सिलिंडर बाहेर काढल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. या आगीत खोलीत वास्तव्यास असलेल्या विद्यार्थिनीची पुस्तके, गॅस सिलेंडर, मिक्सर, पंखा व इतर साहित्य जळून खाक झाले. अग्निशामन दलाच्या तत्परतेने, खोली,मालक राहत असलेले घर व परिसराचे मोठे नुकसान टळले. या घटनेची माहिती सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तसेच नगर सेविका लविना हर्षे, तसेच महावितरण कर्मचारी,शिरीष भालेराव , कुंजर ठाकूर, लड्डा हे ही कर्मचारी तात्काळ इलेक्ट्रिक सप्लाय बंद करण्यासाठी घटनास्थळी हजर झाले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी व कुणीही जखमी झाले नाही. आग विझवण्यासाठी वाहन चालक नितीन इंगोले, सागर टपके, फायरमन अमोल साळुंके, राजेश गजबे, निखिल बाठे, जयकुमार वानखेडे यांनी परिश्रम घेतले. अग्निशमन विभागातील जवानांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. कारण सिलिंडरला आग लागली होती. जर स्फोट झाला असता तर मोठे नुकसान झाले असते कारण, तेथे आणखी एक अतिरिक्त सिलिंडर होते. यामुळे देशमुख यांच्या इमारतीसह लगतच्या अन्य इमारतींमध्येही आग लागण्याची शक्यता होती. तत्काळ विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. तसेच ज्या सिलिंडरला आग लागली होती, त्यावर अग्निशमन द्रव्याचा मारा करण्यात आला. लगेच आगीपर्यंत पोहोचून जवानांनी सिलिंडर गॅस शेगडीपासून दूर केले. तसेच अन्य सिलिंडरही बाहेर काढले. त्यांची समयसुचकता व मोठी घटना टळली.
Source link
नमुना गल्लीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खोलीमधील गॅस सिलिंडरला आग:घरापर्यंत जाण्याचा मार्ग अरुंद, अग्निशमन विभागाची तारांबळ