Headlines

महापौर मंजुषा नागपुरे यांनी पालखी सोहळ्यांचे केले औक्षण:कळस आणि बोपोडी येथे वारकऱ्यांसोबत फुगडीचा आनंद घेतला




पुणे शहराने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे स्वागत केले. आषाढातील रिमझिम सरी, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात लाखो वारकरी पुण्यात दाखल झाले. महापौर मंजुषा नागपुरे यांनी कळस आणि बोपोडी येथे दोन्ही पालख्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. त्यांनी पादुकांचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महापौर नागपुरे यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकरी महिलांसोबत फुगडी खेळत वारीतील उत्साहात सहभाग घेतला. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, राष्ट्रवादी गटनेते सोपान चव्हाण, पक्षनेते नितीन गावडे, आयुक्त नवलकिशोर राम यांच्यासह स्थानिक नगरसेवक, पुणे महानगरपालिका अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेच्या ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’ या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग आणि मुक्कामस्थळांवर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तात्पुरती स्वच्छतागृहे, वैद्यकीय सेवा, प्रकाश व्यवस्था, अग्निसुरक्षा, आपत्कालीन प्रतिसाद पथके आणि नियंत्रण कक्ष यांचा समावेश आहे. महानगरपालिकेचे सर्व विभाग या सेवेसाठी समन्वयाने कार्यरत आहेत. संतांनी दिलेला समता, बंधुता, सेवा आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हा उपक्रम पारंपरिक श्रद्धेला आधुनिक व्यवस्थापनाची जोड देत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदान या विश्वप्रार्थनेचा संदेश जगभरातील भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी १० जुलै रोजी रात्री ९ वाजता सामूहिक ऑनलाईन पसायदान पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. विश्वबंधुत्व, मानवता आणि विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात देश-विदेशातील भाविक डिजिटल माध्यमातून सहभागी होऊ शकणार आहेत. याचे थेट प्रक्षेपण www.punepratham.org या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन हा प्रत्येक पुणेकरासाठी अभिमानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. दोन्ही पालख्यांचे औक्षण करून स्वागत करताना आणि वारकरी भगिनींसमवेत फुगडी खेळताना वारीतील समता, भक्ती आणि आनंदाचा विलक्षण अनुभव घेता आला. वारकरी बांधवांची सेवा हीच संतसेवा मानून महानगरपालिकेचे सर्व विभाग ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’ अंतर्गत अहोरात्र कार्यरत आहेत. स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, सुरक्षा यांसह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, संतांनी दिलेला समता-बंधुतेचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी प्रतिक्रिया महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *