![]()
नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष वैभव बागुल यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली. तब्बल पाच तास चाललेली ही सभा शिवसेना नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या भंगाराच्या कथित गैरव्यवहारासह घनकचरा व्यवस्थापनातील अनियमिततेच्या प्रश्नांवरुन गाजली. या मुद्द्यांवर भाजपातील काही नगरसेवकांनीही पाठिंबा दिल्याने या मुद्यांवर उत्तरे देताना प्रशासनाला विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले. सभेत विविध ६५ विषयांवर चर्चा होऊन विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. सभेत ‘घनकचरा भ्रष्टाचार’ असे लिहिलेल्या गांधी टोपी घालून शिवसेना नगरसेवकांनी उपस्थिती लावत विविध मुद्द्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. शिवसेना गटनेते संदीप उगले यांनी अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या लोखंडी भंगाराच्या कथित चोरी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी चौकशी समितीने प्रथमदर्शनी पाच जणांना दोषी ठरवल्याची माहिती सभागृहात देण्यात आली. नगरसेवक राहुल कोतवाल यांनी संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेक्याबाबत बोलताना उगले यांनी १.९१ कोटी रुपयांच्या वार्षिक करारात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप केला. सहा घंटागाड्यांपैकी केवळ चारच सुरु असल्याचा, कर्मचार्यांचा पीएफ न भरणे, कचरा न उचलताच स्कॅनिंग होत असल्याचा तसेच बायोकल्चर व पॅकेजिंग साहित्यावरील खर्चाबाबत संशय व्यत करण्यात आला. यावर नगराध्यक्ष वैभव बागुल यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळणार्यांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, शिवसेना गटनेते संदीप उगले, नगरसेविका प्रियांका राऊत, सुधीर कबाडे, नयना वाघ, पल्लवी मोरे, मनीषा भालेराव, मुख्याधिकारी दिनेश सिनारे आदींसह नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.सभेत मोकाट श्वानांचे निर्बिजीकरण, विद्युत खांबांचे स्थलांतर, धोकादायक वृक्षतोड, रुग्णवाहिका व वैकुंठ रथ, रिंगरोड, पूरपाणी निचरा यासह विविध प्रश्न मांडण्यात आले.
Source link
गैरव्यवहाराच्या मुद्द्यांनी चांदवडची सभा वादळी:शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांना भाजपमधील काही नगरसेवकांचाही पाठिंबा