Headlines

दिव्य मराठीच्या वृत्ताची दखल:खादगाव–गवारे वस्ती रस्ता; लोकप्रतिनिधींकडून पाहणी, गावकऱ्यांनी मानले आभार‎




खादगाव ते गवारे वस्ती घोडेगाव या तीन किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘ दिव्य मराठी’मध्ये वृत्त प्रकाशित होताच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या ५ ते ७ वर्षांपासून या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला जात होता. मात्र, प्रशासनाकडून दाद न मिळाल्याने आणि पावसामुळे रस्त्यावर प्रचंड चिखल झाल्याने २०० हून अधिक शेतकऱ्यांचे हाल होत होते. अखेर शेतकऱ्यांनी स्वतः १ लाख ६० हजार रुपयांची वर्गणी गोळा करून, भर पावसात दोन दिवस श्रमदान करत रस्त्यावर मुरूम टाकला आणि वाहतूक सुरू केली. या चिखलमय रस्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ‘दिव्य मराठी’ने या समस्येला वाचा फोडली. वृत्ताची दखल घेत वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आमदार निधीतून ५ लाख रुपयांचे पत्र देऊन, मुरूम टाकून रस्ता पूर्णपणे सुरू करू, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, उन्हाळ्यात रस्त्याचे मजबुतीकरण करून देण्याचा शब्दही दिला. जिल्हा परिषदेच्या सभेत विषय उपस्थित होणार दुसरीकडे, जि. प. सदस्या स्वातीताई पाटेकर यांचे पती योगेश पाटेकर यांनी बुधवारी थेट चिखलमय रस्त्यावर जाऊन शेतकऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी त्यांनी शासनाकडून मंजुरी मिळाली नाही, तरी गरज पडल्यास स्वतःची जमीन विकून हा रस्ता करून देईन, अशी ग्वाही दिली. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांच्याशी संपर्क साधला. गलांडे यांनीही जिल्हा परिषद शेतकऱ्यांच्या पाठीशी असून संभाजीनगर येथील विशेष बैठकीत हा विषय मांडून कायमस्वरूपी मंजुरीसाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *