![]()
तालुक्यातील आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज माउली यांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा शुक्रवारी बीड जिल्ह्यातील शिरूर येथील बोरगाव चकल्यात पार पडला. पालखीप्रमुख ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज माउली, माता रुक्मिणी व पिता विठ्ठलपंत यांच्या पालखी रथ सोहळ्याचे शुक्रवारी संत वामनभाऊ महाराजांची जन्मभूमी असलेल्या बोरगाव चकला येथे अभूतपूर्व उत्साहात स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च् या अखंड नामघोषाने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. पालखीचे आगमन होताच हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. या वेळी पारंपरिक घोड्याच्या रिंगणाने वारकरी सोहळ्याचे आध्यात्मिक वैभव अधिकच खुलून आले. गुरुवर्य विष्णू महाराजांच्या कृपाशीर्वादातून १९७२ मध्ये स्थापन झालेली माउली अध्यात्म संस्था आजही वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी कार्यरत आहे. संस्थेच्या परिसरात भगवान शंकराचे भव्य मंदिर असून गुरुवर्यांनी सुरू केलेली ज्ञानदानाची परंपरा अखंडपणे सुरू आहे. येथे अध्यात्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने राबवले जात आहे. संत वामनभाऊ महाराजांची जन्मभूमी म्हणून बोरगाव चकला हे वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. या भूमीला वारकरी परंपरेत विशेष स्थान प्राप्त झाले आहे. विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार पालखीचा येथे दीड दिवस मुक्काम असतो. या मुक्कामादरम्यान माउलींचा महाअभिषेक, हरिनाम संकीर्तन, कीर्तन, प्रवचन, भजन, महाप्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे पालखी प्रमुख ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी सांगितले.
Source link
बोरगाव चकल्यात संत ज्ञानेश्वर महाराज माउली पालखीचा पहिला रिंगण सोहळा:भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी; दीड दिवसाचा मुक्काम