Headlines

एकनाथ शिंदेंकडे स्वतःचा राजकीय स्वाभिमान उरलेला नाही:अमित शाह एका पायावर उभं राहायला सांगतील तर तसंही करतील, कन्हैया कुमारांची जहरी टीका




काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना अत्यंत आक्रमक भाषा वापरली. अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), उत्तर प्रदेश सरकार आणि मंदिर ट्रस्टवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही वैयक्तिक टीका करत, “अमित शाह यांनी एका पायावर उभं राहायला सांगितलं तर ते तसेही उभे राहतील,” असा टोला लगावला. राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराला कन्हैया कुमार यांनी “महापाप” आणि “जघन्य अपराध” असे संबोधले. प्रभू श्रीराम हे कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असल्याने या प्रकरणावर राजकारण न करता निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, या प्रकरणात भाजप नेते आणि संघ परिवाराचे समर्थन करणारी वक्तव्ये “लाजिरवाणी” असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘रामांना आणलं म्हणून देणगीही चोरणार?’ भाजप समर्थकांकडून “रामांना आम्ही आणलं, त्यामुळे देणगीबाबत प्रश्न विचारू नका” अशा प्रकारचे युक्तिवाद केले जात असल्याचा दावा करत कन्हैया कुमार म्हणाले, “राम त्रेतायुगात आले होते, हे आजचे नेते घेऊन आलेले नाहीत. श्रद्धेच्या नावावर जनतेच्या भावनांशी खेळ सुरू आहे.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधत, भूमिपूजन आणि उद्घाटनावेळी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी घेतली गेली, मात्र कथित गैरव्यवहार समोर आल्यानंतर त्यांनी मौन बाळगल्याची टीका केली. ट्रस्ट बरखास्त करा, सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा काँग्रेसची भूमिका स्पष्ट करत कन्हैया कुमार यांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्या. राम मंदिर ट्रस्ट तातडीने बरखास्त करावा, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या मते, केवळ नोटा मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून उपयोग नाही. अयोध्येपासून दिल्लीपर्यंत या कथित गैरव्यवहारात जे कोणी सहभागी असतील, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. ‘एसआयटीवरही प्रश्नचिन्ह’ उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकावर (SIT) देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या पथकाचे प्रमुख अधिकारी स्वतः फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी असल्याचा दावा करत, “चोराच्या हातीच कोतवाली दिल्यास न्याय कसा मिळणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘धर्मावर नव्हे, जनतेच्या प्रश्नांवर राजकारण’ धार्मिक मुद्द्यांवर राजकारण करण्याचा काँग्रेसचा हेतू नसल्याचे स्पष्ट करत कन्हैया कुमार म्हणाले, “आम्ही शिक्षण, रोजगार, पेपरफुटी, महागाई, शेतकरी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करू. धर्माचा राजकीय वापर भाजप-आरएसएसने केला आहे, त्याच पद्धतीने आम्ही राजकारण करणार नाही.” एकनाथ शिंदेंवर वैयक्तिक टीका पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘रामरक्षा’ आंदोलनावर केलेल्या टीकेबाबत विचारले असता कन्हैया कुमार यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया दिली. “ज्यांचे स्वतःचे कोणतेही राजकीय अस्तित्व नाही, त्यांच्यावर भाष्य करण्याची गरज वाटत नाही. अमित शाह यांनी एका पायावर उभे राहायला सांगितले तर एकनाथ शिंदे तसे करतील. डोक्यावर उभे राहायला सांगितले तरी ते तसेच करतील. त्यांच्याकडे स्वतःचा राजकीय स्वाभिमान उरलेला नाही,” अशी जहरी टीका त्यांनी केली. पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे. त्या परंपरेतून आलेला नेता आज अमित शाह यांच्यासमोर शरण गेला आहे आणि अमित शाह स्वतः डोनाल्ड ट्रम्पसमोर शरण जातात,” असा आरोपही त्यांनी केला. ‘महाविकास आघाडीत प्रत्येक पक्ष स्वतंत्र’ शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत विचारलेल्या प्रश्नावर कन्हैया कुमार यांनी संयत भूमिका घेतली. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाला स्वतंत्र राजकीय भूमिका घेण्याचा अधिकार असल्याचे सांगत, काँग्रेस कोणालाही आदेश देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील राजकारण आता दोन विचारांमध्ये विभागले गेले असून, एक बाजू संघर्ष करणाऱ्यांची तर दुसरी बाजू सत्तेसमोर शरण जाणाऱ्यांची असल्याचा दावा त्यांनी केला. जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस निर्णायक लढा उभारणार असून, या लढ्यात सहभागी होणाऱ्या सर्वांचे स्वागत असल्याचेही कन्हैया कुमार यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *