Headlines

शहरात लव्ह, खनिज अन् ड्रग्ज जिहाद फोफावला- तोगडिया:कारवाई योग्य दिशेने असे सांगत सर्वांनाच टाकले बुचकळ्यात‎




शहरात लव्ह जिहाद, ड्रग्ज जिहाद आणि खनिज जिहाद फोफावल्याचे निरीक्षण आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी नोंदवले. मात्र त्याचवेळी हा जिहाद थांबवण्यासाठी सरकार योग्य दिशेने प्रयत्न करीत असल्याचे सांगून त्यांनी सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे. देशभर एक लाख ठिकाणी हनुमान चालिसा पठण सुरु करण्याचे उद्दिष्ट घेऊन गेल्या सहा महिन्यांपासून देशाटन करायला निघालेले डॉ. तोगडिया सोमवारी अमरावतीत होते. यानिमित्त त्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधला. सकाळी एका हॉटेलमध्ये संवाद साधताना त्यांनी वरील निरीक्षण नोंदवले. त्यांच्यामते जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील जिहादी तयार होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून येथे लव्ह जिहाद, चोरी करुन खनिजाची विल्हेवाट लावण्यासाठी खनिज जिहाद आणि तरुण पिढी बिघडवण्यासाठी ड्रग्ज जिहाद घडवून आणला जात आहे. मग या जिहादाला थांबवणार कोण, असे विचारले असता त्यांनी मात्र सरकार योग्य दिशेने पाऊल टाकत असल्याचाही निर्वाळा दिला. त्यांच्या या उत्तराने अनेकांनाच बुचकळ्यात टाकले. दरम्यान या विषयाच्या खोलात जाण्यापासून त्यांनी स्वत:ला अलिप्त ठेवले. त्यांच्यामते सरकार चांगले काम करीत असले तरी यंत्रणा सर्वच कामे करु शकत नाही. त्यामुळे हनुमान चालीसा पठणाच्या माध्यमातून आम्हीच सरकारला मदत करु आणि सर्व हिंदूना एकत्रीत करुन जिहादींना नमवू, असे पूरक उत्तरही त्यांनी दिले. दुपारी एका पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी पुन्हा माध्यमांशी बोलताना डॉ. तोगडिया यांनी काही नवे मुद्दे मांडले. त्यांच्यामते देशात एक लाख ठिकाणी हनुमान चालिसा पठण सुरु झाल्यास प्रत्येक ठिकाणचे १०० लोकं गृहीत धरल्यास एक कोटी लोकं यानिमित्ताने एकत्रित होणार आहेत. यामध्ये डॉक्टर, वकील, प्राध्यापक असे सर्वच जण राहणार आहेत. या सर्व हिंदूंच्या माध्यमातून आम्ही ‘हिंदू प्रथम’ हा विचार रुजवून जिहादींचा पत्ता साफ करण्यास मदत करणार आहोत. पत्रकार परिषदेला समाजसेवक लप्पीसेठ जाजोदिया, विहिंपचे महेश साहू आदी मान्यवर उपस्थित होते. अमरावतीत ९ ठिकाणी पठण, लवकरच ही संख्या १०० करु स्थानिक पातळीवर सद्या नऊ ठिकाणी हनुमान चालिसा पठण सुरु असून, लवकरच ही संख्या शंभरावर नेली जाणार आहे. या शहरात असे जाळे तयार झाल्यानंतर हिंदू हेल्पलाईन सुरु केली जाणार आहे. त्याआधारे आरोग्य तपासणी, वैद्यकीय मदत, रोजगाराची उपलब्धता अशा बाबी पूर्णत्वास नेऊन समृद्ध, सुरक्षित व संपन्न हिंदू समाजाचे निर्माण केले जाणार असल्याचेही डॉ. तोगडिया यांनी यावेळी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *