Headlines

पालखी सोहळ्यात भाविकांचे साडेपाच लाखांचे दागिने लंपास:पुणे, मांजरी, हडपसर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल




पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाविकांकडून सुमारे साडेपाच लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. कडक पोलीस बंदोबस्त असतानाही पुणे-सोलापूर रस्ता, भवानी पेठ आणि हडपसर परिसरात या घटना घडल्या. याप्रकरणी समर्थ, मांजरी आणि हडपसर पोलीस ठाण्यांमध्ये चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी (९ जुलै) शहरात मुक्कामी आला होता. भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर परिसरात शुक्रवारी (१० जुलै) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका ५१ वर्षीय महिलेच्या गळ्यातील एक लाख दहा हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवले. गणेश पेठेत राहणाऱ्या या महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पुढील तपास करत आहेत. शहरातून पालखीने श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवल्यानंतर प्रस्थान मार्गावरही दागिने चोरीच्या घटना घडल्या. पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी येथे शनिवारी (११ जुलै) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याची साखळी असा ९० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस कर्मचारी सोनवणे तपास करत आहेत. हडपसरमधील गाडीतळ चौकात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेसह एकूण दहा भाविकांच्या गळ्यातील तीन लाख ५६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी सकाळी घडली असून, एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, पालखी सोहळ्यात भाविक आणि वारकऱ्यांकडून दागिने व रोकड चोरणाऱ्या ८९ संशयितांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. यामध्ये ६७ महिलांचा समावेश आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *