![]()
शेंद्रा ते पुणे (मार्गे बिडकीन) या ग्रीनफील्ड महामार्गाला शासनाकडून मंजुरी मिळाली असून या रस्त्यासाठी जमीन मोजणीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, शासनाने अगोदर जमिनींचा बाजारभाव निश्चित करावा, त्यानंतरच मोजणी करावी, असा एल्गार बिडकीन आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पुकारला आहे. या संदर्भात बिडकीन येथे शेतकऱ्यांची रविवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे नियोजन अॅड. संचित पातुनकर यांनी केले होते. याप्रसंगी सरपंच अशोक धर्मे, डीएमआयडीसी प्रकल्पग्रस्त समितीचे सचिव नंदकुमार वैद्य, विलास अग्रवाल, सुभाष दुबे यांनी बैठकीत आपली मते मांडली. शासन शेतकऱ्यांना गृहीत धरून परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्यात जात आहेत त्यांना अद्याप कोणतीही माहिती न देता किंवा विश्वासात न घेता थेट मोजणी जाहीर केली आहे. मोबदल्याचा भाव काय असेल हेही स्पष्ट केले नाही. भाव ठरवल्याशिवाय मोजणी करू दिली जाणार नाही, असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. या बैठकीसाठी हिवरा, करमाड, गंगापूर, बिडकीनचे शेतकरी उपस्थित होते. आयुष्यभर प्रकल्पग्रस्तच राहायचे का? औरंगपूरवाडी येथील शेतकरी कल्याण भवर यांनी सांगितले की, आम्ही आधीच जायकवाडी प्रकल्पग्रस्त आहोत. आता औरंगपूरवाडीत स्थायिक झालो, तर माझ्या गट नंबर ४६ मधील ३ एकर जमीन, घर, गोठा, विहीर आणि मोसंबीची बाग या रस्त्यात जात आहे. आम्ही आयुष्यभर फक्त प्रकल्पग्रस्त म्हणूनच जगायचे का? असा सवाल त्यांनी केला.
Source link
अगोदर भाव ठरवा, नंतरच मोजणी:बिडकीन येथील बैठकीमध्ये ग्रीनफील्ड मार्गासाठी शेतकऱ्यांचा एल्गार