![]()
सदाशिवराव माने विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी ज्ञानार्जनात तल्लीन असताना अचानक सायरनचा आवाज करत एकामागून एक पोलिस गाड्या या विद्यालयाच्या प्रांगणात आल्या, त्यातून पटापट पोलीस अधिकारी उतरले, विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढले व पोलिस शिपाई सावधपणे आपल्या बंदुका सावरत सावजाचा शोध घेऊ लागले. वरिष्ठ त्यांच्या भाषेत आज्ञा करत असतानाच अचानक एकाला घेऊन चौघे शिपाई आले आणि सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हा खरा प्रकार नाही की सिनेमातील प्रसंग नाही, तर अकलूज पोलिसांनी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिरेकी हल्ला व बॉम्ब निकामी करण्याचे प्रात्यक्षिक ‘मॉक ड्रिल’ केले होते. जगतगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना वारकऱ्यांच्या आणि पालखीच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पालखी सोहळ्यात व मुक्कामाच्या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यंत्रणा सज्ज असावी यासाठी अकलूज पोलिसांच्या वतीने येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या आवारात पोलीस दल आणि विविध सुरक्षा यंत्रणांच्या वतीने संयुक्त ‘मॉक ड्रिल’ राबवण्यात आले. या संपूर्ण पथकात सोलापूर येथील शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक व दहशतवाद विरोधी पथक तसेच अकलूज पोलीस ठाण्याचे १ पोलीस निरीक्षक, १ सहायक पोलीस निरीक्षक व १० कर्मचारी सामील होते. ^पालखी सोहळ्यातील भाविकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असते. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आमची पथके २४ तास सज्ज आहेत, हेच या मॉक ड्रिलच्या माध्यमातून दाखवून देण्यात आले आहे. – नीरज उबाळे, पोलिस निरीक्षक
Source link
अकलूजमध्ये पोलिसांचे मॉक ड्रिल:अतिरेक्यांना जेरबंद करण्याचे, बॉम्ब निकामी करण्याचे दाखवले प्रात्यक्षिक