![]()
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पिपलीबुर्गी उपपोलिस स्टेशनच्या हद्दीतील कुंडम गावाजवळ रविवारी नक्षलवादी कॉम्रेड अशोकच्या नावाची पत्रके आणि एक बॅनर आढळून आले असून, यात नागरिकांनी विविध कंपन्या आणि ड्रोन सर्वेक्षणाला सामूहिक विरोध करावा,अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील,अशी चेतावणी देण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा सशस्त्र नक्षलवादी चळवळ सक्रिय होत असल्याची चर्चा सुरू झाली असून,पोलिस व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. स्वतःला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित कॉम्रेड अशोक असल्याचा उल्लेख करणाऱ्या या पत्रकांमध्ये ओमसाई, नॅचरल कंपनी, सनफ्लॅग, जेएसडब्ल्यू प्रकल्प तातडीने बंद करण्याची आणि हेड कसा–कुरी–मोहरली व खेमरागडी–पिपली बुर्गी परिसरातील प्रस्तावित ड्रोन सर्वेक्षण थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थ, सरपंच आणि पोलिस पाटील यांनी या कंपन्यांना विरोध करावा,असे आवाहन करत या प्रकल्पांमुळे जल, जंगल आणि जमीन धोक्यात येऊन स्थानिकांच्या अस्तित्वावर संकट येईल, असा दावा यात करण्यात आला आहे. सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे जिल्ह्यातील नक्षलवादी कारवाया कमकुवत झाल्याचा दावा प्रशासन करत असतानाच हा प्रकारसमोर आल्याने पोलिसांनी घटनास्थळावरील साहित्य जप्त केले असून, संवेदनशील जंगल भागात सुरक्षाव्यवस्था वाढवून तीव्र शोध मोहीम सुरू केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ही राष्ट्रीय स्तरावरील नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे.आणि तो अशा प्रकारची पत्रकबाजी करीत नाही. सदर पत्रामध्ये कुठेही माओवाद किंवा नक्षलवाद असा उल्लेख नाही. त्यामुळे हे पत्रक फेक आहे. सध्या दक्षिण गडचिरोलीमध्ये खाण विषयावरून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. त्यामुळे एखाद्या कंपनीला येथे स्थान मिळू नये यासाठी दुसऱ्या एखाद्या कंपनीने आपल्या दलालामार्फत असे फेक पत्रक व बॅनर लावून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी या पत्रकाची सखोल चौकशी करावी. – कॉ. अमोल मारकवार, जिल्हा महासचिव मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी. बॅनर आणि पत्रकांची चौकशी सुरू पिपली बुर्गी परिसरात आढळलेल्या बॅनर आणि पत्रकांची चौकशी सुरू आहे. ते खरोखर नक्षलवाद्यांनीच लावले आहेत का की आणखी कोणी, याची खातरजमा केली जाईल. – एम.रमेश, पोलिस अधीक्षक, गडचिरोली लोकांच्या डोक्यातून अद्याप नक्षलवाद गेलेला नाही ! या पत्रकात कॉमरेड अशोक मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असा उल्लेख असल्यामुळे या पत्रकाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. उल्लेखनीय आहे की नक्षलवादी पत्रकांमध्ये कम्युनिस्ट पार्टी माओवादी असा उल्लेख असतो. मागील दहा -पंधरा वर्षांच्या काळातील नक्षलवाद्यांच्या पत्रकांमध्ये ”माओवादी” असाच उल्लेख आला आहे. पत्रकातील भाषा जरी नक्षलवादी पद्धतीची असली तरी त्यात भाषेची बरीच तफावत आहे.त्यामुळे हे पत्रक आणि मजकूर हा कुणीतरी स्थानिक नागरिक, ज्याला अजूनही अशा प्रकल्पांना विरोध व्हावा असे वाटते. त्याने हा उद्योग केला असावा. असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस याची सत्यता लवकरच समोर आणतील.परंतु लोकांच्या डोक्यातून नक्षलवाद अद्याप गेलेला नाही. हे मात्र या निमित्ताने स्पष्ट होताना दिसत आहे.
Source link
गडचिरोलीमध्ये नक्षलवादी पत्रके, बॅनर जप्त:मार्क्सवादाच्या नावावर काॅ. अशोकचे पत्रक; विविध कंपन्यांसह ड्रोन सर्वेक्षणाला विरोध दर्शवत दिली धमकी