Headlines

भारतीय रेल्वे सर्वात विश्वासार्ह, सुरक्षित प्रवास साधन:डॉ. केतन गोखले यांचे 'रेल्वे: भारताची जीवनरेखा' प्रकाशन प्रसंगी मत




भारतीय रेल्वे हे सर्वात विश्वासार्ह आणि सुरक्षित प्रवास साधन आहे, असे मत कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन गोखले यांनी व्यक्त केले. ‘रेल्वे: भारताची जीवनरेखा’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. हे पुस्तक डॉ. शिरीष यंदे, हेमंत जोगदेव आणि आशिष कुवेलकर यांनी लिहिले आहे. रोहन प्रकाशन आणि मॉडेल रेल्वे सोसायटीतर्फे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नवलमल फिरोदिया सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर, पुस्तकाचे लेखक डॉ. शिरीष यंदे, हेमंत जोगदेव, आशिष कुवेलकर आणि रोहन प्रकाशनाचे संस्थापक-संचालक प्रदीप चंपानेरकर उपस्थित होते. डॉ. गोखले यांनी सांगितले की, भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी आणि आशियातील सर्वात मोठी रेल्वे प्रणाली आहे. १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे दरम्यान पहिली प्रवासी रेल्वे सुरू झाली. तेव्हापासून भारतीय रेल्वे विभागाने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. शिस्तबद्ध सांकेतिक एकरूपता हे भारतीय रेल्वेच्या कार्यप्रणालीचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी आपल्या लहानपणीचे लोको पायलट किंवा टीसी होण्याचे स्वप्न सांगितले आणि रेल्वेचे उच्चपदस्थ अधिकारी होण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना रोहित चंदावरकर म्हणाले की, भारतीय रेल्वेमुळे भारतातील विविध प्रांत सांस्कृतिकदृष्ट्या जोडले जातात. भारतीय रेल्वे हे एकमेव सरकारी कार्यालय आहे जिथे जाताना लोकांना आनंद होतो. ‘रेल्वे: भारताची जीवनरेखा’ हे पुस्तक भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांचा, घटकांचा आणि तांत्रिक प्रगतीचा सर्वांगीण आढावा घेते. हे पुस्तक भारतीय रेल्वेचा मिनी एनसायक्लोपिडीया असल्याचे त्यांनी नमूद केले. चंदावरकर यांनी पुढे सांगितले की, भारतीय रेल्वे हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. दिल्लीतील रेल्वेमंत्र्यांवरून देशभरातील रेल्वेच्या स्थानिक घडामोडींचा अंदाज येतो. भारतीय रेल्वे म्हणजे भारताचा इतिहास, तंत्रज्ञान आणि भविष्य यांचा एक जिवंत वारसा आहे, जो अशा पुस्तकांच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *