![]()
रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकण्याची सवय असणाऱ्या मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उघड्यावर थुंकणाऱ्यांच्या या प्रवृत्तीला थेट ‘राष्ट्रीय छंद’ असे संबोधत मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, या सवयीला आळा घालण्यासाठी उघड्यावर थुंकणाऱ्यांवर आकारण्यात येणारा २५० रुपयांचा दंड थेट २ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचे निर्देश न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. थुंकणे हा आता ‘राष्ट्रीय छंद’ मुंबईतील अस्वच्छतेच्या मुद्द्यावर बुधवारी (१५ जुलै) झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने बीएमसीच्या कारभारावर ताशेरे ओढले. सार्वजनिक जागा, रस्ते आणि पदपथांवर कचरा टाकल्याप्रकरणी आणि उघड्यावर थुंकण्याबाबत न्यायालयाने कठोर भूमिका घेतली. थुंकणे हा आता देशाचा एक ‘राष्ट्रीय छंद’ बनला असल्याचे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना निर्देश देताना न्यायालयाने स्पष्ट केले की, रस्त्यांवर कचरा आढळल्यास संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांची थेट जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. इच्छाशक्ती असेल तर स्वच्छता कठीण नाही: इंदूरचे उदाहरण सुनावणीदरम्यान न्यायालयाने भारतातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या ‘इंदूर’ शहराचे आणि तिथल्या वॉर्ड अधिकाऱ्यांच्या कार्यक्षम कार्यप्रणालीचे आवर्जून उदाहरण दिले. बीएमसीसारख्या प्रचंड संसाधने आणि निधी उपलब्ध असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेने मनात आणले आणि त्यांच्याकडे ‘इच्छाशक्ती’ असेल, तर रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे अजिबात कठीण काम नाही, असे उच्च न्यायालयाने अधोरेखित केले. सीसीटीव्हीद्वारे नजर, दंड वाढवण्याच्या सूचना यावेळी महापालिकेच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील अनिल सखारे यांनी न्यायालयाला सांगितले की, संपूर्ण शहरात ‘बीएमसी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) स्वच्छता व आरोग्यविषयक उपविधी, २०२५’ ची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा महापालिकेचा विचार आहे. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, या नियमांतर्गत असलेल्या दंडात्मक तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रभावी वापर केला जावा. तसेच, लोकांवर वचक बसवण्यासाठी सध्याचा २५० रुपयांचा दंड वाढवून तो थेट २००० रुपये करण्यात यावा, अशा सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. यामुळे आता मुंबईत उघड्यावर थुंकणे आणि कचरा करणे चांगलेच महागात पडणार आहे. हेही वाचा.. CBIचा दावा: लातूरच्या कोचिंग संचालकाने NEETचा पेपर विकत घेतला: मोबाइलमध्ये हस्तलिखित केमिस्ट्रीचे 132 प्रश्न, त्यापैकी 111 मूळ पेपरशी जुळले CBI ने बुधवारी सांगितले की, नीट पेपरफुटी प्रकरणात कोचिंग सेंटर मालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांनी केमिस्ट्रीच्या पेपरसाठी 5 लाख रुपये दिले होते. CBI ने एका विशेष न्यायालयाला मोटेगावकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान सांगितले की, त्यांनी NTA प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलवर असलेल्या पी. व्ही. कुलकर्णी यांना 5 लाख रुपये दिले. मोटेगावकर यांचा मुलगा कुलकर्णी यांच्या कोचिंग क्लासलाही जात होता. एजन्सीने सांगितले की, मोटेगावकर यांनी कुलकर्णी यांच्या केमिस्ट्री ट्यूटोरियल क्लासेसमध्ये दिलेल्या पेपरमधून हस्तलिखित नोट्स तयार केल्या होत्या. सविस्तर वाचा
Source link
उघड्यावर थुंकणे हा तर आता राष्ट्रीय छंद!:हायकोर्टाची संतप्त टिप्पणी, मुंबईत थुंकल्यास आता मोजावे लागणार 2 हजार रुपये