![]()
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पक्ष ‘एनडीए’त सहभागी होणार असल्याच्या केवळ अफवा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आधीच स्पष्ट भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर अवघ्या 15 दिवसांत जर शरद पवार एनडीएमध्ये आले, तर जनतेचा राजकीय नेत्यांवरील विश्वासच उडून जाईल, असा थेट दावा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येईल याबाबत मला व्यक्तिशः शंका असून, ‘देवाच्या इच्छेने मी सध्या मंत्रिमंडळातून बाहेर आहे,’ अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी यावेळी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांवर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले. मुनगंटीवार म्हणाले की, राजकारणात कोणीही कोणाचे महत्त्व कमी करू शकत नाही. नेत्याच्या स्वतःच्या चुकांमुळेच पक्षाचे किंवा त्याचे महत्त्व कमी होत असते. एकनाथ शिंदे हे भाजपचे खंदे मित्र आहेत. भाजप विरोधी बाकांवर असताना ते सत्ता सोडून आमच्यासोबत आले. त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; आणि तसा प्रयत्न झाला तर ते जनतेलाही खपणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा किंवा मोठा व्हावा असे वाटणे ही स्वाभाविक महत्त्वाकांक्षा असून, त्यात काहीही गैर नाही. सुधीर मुनगंटीवार आज सपत्नीक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर आपली रोखठोक भूमिका मांडली. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा फुसका बार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सध्या राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र, आता जर या चर्चा जाहीरपणे सुरू झाल्या असतील, तर 75 टक्के हा विस्तार आता होणारच नाही, हे मी माझ्या प्रदीर्घ अनुभवावरून ठामपणे सांगू शकतो, असे म्हणत त्यांनी विस्ताराची शक्यता फेटाळून लावली. प्रशासनाच्या कारभारावर मुनगंटीवार कमालीचे नाराज विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या मुनगंटीवार यांनी पंढरपूर मंदिर प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी निमंत्रण दिले म्हणूनच आपण दर्शनासाठी आलो होतो, असे सांगत ते म्हणाले, “मंदिरात सध्या व्हीआयपी दर्शन बंदी लागू आहे, याची प्रशासनाने आम्हाला आधीच स्पष्ट कल्पना द्यायला हवी होती. तसे असते तर आम्ही दोन महिन्यांनंतर दर्शनाला आलो असतो. मुनगंटीवार यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे त्यांनी प्रशासकीय ढिसाळ नियोजनावर जाहीर संताप व्यक्त केला.
Source link
..तर जनतेचा राजकीय नेत्यांवरील विश्वासच उडून जाईल:पवारांच्या एनडीए प्रवेशावरून मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा हवाला