![]()
वडाळीभोई येथे उभारण्यात येणारे भव्य व्यापारी संकुल (हायवे मॉल) परिसरातील व्यापाराला नवी दिशा देणार असून, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन आहेर यांनी व्यक्त केला. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वडाळीभोई व वडनेरभैरव येथील उपबाजार आवारात विविध महत्त्वाकांक्षी विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना सभापती आहेर यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती कटिबद्ध असून, त्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, व्यापारी संकुलामुळे स्थानिक व्यापाराला चालना मिळेल, ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला गती मिळेल आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच वडनेरभैरव उपबाजार आवारातील मुख्य प्रवेशद्वार व चेन लिंक फेन्सिंगसह वॉल कंपाऊंड उभारल्याने आवाराची सुरक्षितता अधिक मजबूत होणार असून, या दोन्ही विकासकामांचा थेट लाभ शेतकरी व व्यापाऱ्यांना मिळणार आहे. नियोजित कार्यक्रमानुसार वडाळीभोई उपबाजार आवारातील व्यापारी संकुल (हायवे मॉल) बांधकामाचे भूमिपूजन माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या हस्ते झाले. त्यानंतर वडनेरभैरव उपबाजार आवारातील मुख्य प्रवेशद्वार व चेन लिंक फेन्सिंगसह वॉल कंपाऊंड बांधकामाचे भूमिपूजन संचालिका मीना शिरसाठ व बापू शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. वडाळीभोई येथील कार्यक्रमास उपसभापती विक्रम मार्कंड, संचालक पंढरीनाथ खताळ, योगेश ढोमसे, राजेंद्र दवंडे, सुखदेव जाधव, गणेश निंबाळकर, डॉ. वैशाली जाधव आदींसह बाजार समितीचे कर्मचारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. वडनेरभैरव येथील कार्यक्रमास बाजार समिती संचालक मंडळासह रावसाहेब भालेराव, सुनील पाचोरकर, डॉ. शामराव जाधव, बबन वक्टे, मंगेश वक्टे आदी मान्यवर, व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडाळीभोई येथे उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलामुळे स्थानिक व्यापाराला चालना मिळून युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. वडनेरभैरव उपबाजार आवारातील मुख्य प्रवेशद्वार व वॉल कंपाऊंडमुळे आवाराची सुरक्षितता वाढणार असून, शेतकरी व व्यापाऱ्यांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
Source link
वडाळीभोईतील हायवे मॉल ग्रामीण व्यापाराला नवी दिशा देणारा ठरेल:चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेर यांचे प्रतिपादन