![]()
गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेत सापडलेल्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना गुरुवारी आणि शुक्रवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसाने मोठा दिलासा दिला. बार्शी शहर, वैरागसह तालुक्यातील विविध भागांत मध्यम ते दमदार स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतशिवारात पुन्हा ओलावा निर्माण झाला असून करपण्याच्या मार्गावर असलेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे हास्य फुलले आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी पूर्ण केली होती. मात्र त्यानंतर जवळपास महिनाभर पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत गेला. उगवून आलेली कोवळी पिके उन्हाच्या तडाख्यामुळे सुकू लागली होती. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली होती, तर काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची शक्यता गृहीत धरून चिंता व्यक्त केली होती. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतशिवार पुन्हा हिरवाईने नटण्याची आशा निर्माण झाली आहे. कृषी विभागाच्या मते, पुढील आठवडाभरात चांगला पाऊस कायम राहिल्यास खरीप पिकांच्या वाढीस पोषक वातावरण तयार होईल आणि उत्पादनक्षमतेतही वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे आता बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आगामी पावसाकडे लागल्या असून यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये आतापर्यंत सरासरी १२३.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बार्शी, वैराग, नारी, उपळे, सुडी, गौडगाव आणि खांडवी या सर्व मंडळांमध्ये १२३.७ मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. मात्र या पावसाचे वितरण असमान राहिल्याने अनेक भागांत ओलाव्याची कमतरता जाणवत होती. गुरुवारी झालेल्या पावसामुळे ही तूट काही प्रमाणात भरून निघाली आहे. पावसाअभावी अनेक शेतकरी दुबार पेरणीच्या भीतीने धास्तावले होते. बियाणे, खते आणि मशागतीवर मोठा खर्च झाल्यानंतर पिके करपल्यास आर्थिक फटका बसण्याची शक्यता होती. मात्र गुरुवारी झालेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट सध्या तरी टळल्याचे चित्र आहे. आगामी काही दिवसांतही समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप हंगामाला चांगली गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. बार्शी तालुक्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी पेरणीला वेग आला असून १६ जुलै २०२६ अखेर तालुक्यातील एकूण ७३,१७७.१० हेक्टर क्षेत्रापैकी ४८,३६३.०५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण पेरणी ६६.०९ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी दिली. सोयाबीनचे नियोजित क्षेत्र ५६,४७२ हे असून त्यापैकी ४६१९० हे.क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. म्हणजेच सोयाबीनची पेरणी ८१.७९ टक्के झाली असून तालुक्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून सोयाबीन आघाडीवर आहे. कडधान्य पिकांमध्ये तूर पिकाची ७३३३.४० हे. क्षेत्रापैकी ११५३.९० हे. क्षेत्रावर (१५.७३ टक्के) पेरणी झाली. उडीद पिकाची ७५९६.४० हेक्टर क्षेत्रापैकी ८२१.०५ हे. क्षेत्रावर (१०.८१ टक्के) तर मूग पिकाची १२७२.६० हेक्टर क्षेत्रापैकी १०३.१० हे. क्षेत्रावर (८.१० टक्के) पेरणी पूर्ण झाली आहे.
Source link
दिलासा:दुबार पेरणीचे संकट टळले, बार्शी तालुक्यामध्ये 66 टक्क्यांवर पेरा