![]()
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आज बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे. या घटनेनंतर अद्याप कुटुंबाला न्यायाची प्रतीक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर केतनची बहीण संजना अग्रवाल यांनी पुण्यातील आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. अत्यंत भावुक अवस्थेत त्यांनी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करत आपल्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळावा, असे साकडे घातले. न्यायव्यवस्थेवरील विश्वासासोबतच आता या दुःखी कुटुंबाने देवाकडेही आपल्या भावाच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि न्यायासाठी धाव घेतली आहे. ‘एक महिना झाला, त्याचा आवाज ऐकला नाही’ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना संजना अग्रवाल यांना अश्रू अनावर झाले. आपल्या मनातील साठलेल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “आज माझ्या भावाला जाऊन बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे. या एका संपूर्ण महिन्यात मी त्याला एकदाही पाहिलेले नाही, त्याचा आवाज ऐकलेला नाही किंवा त्याचे निरागस हसणेही माझ्या कानावर पडलेले नाही. तो आता आपल्यात नाही यावर अजूनही आमचा विश्वास बसत नाही. मी श्री गणेशाकडे फक्त एकच प्रार्थना करते की, माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळावा. तो आता जिथे कुठे असेल, तिथे तो सुखात आणि शांततेत असावा, हीच माझी बाप्पाकडे प्रार्थना आहे.” आजोबांचा वाढदिवस अन् कुटुंबावर दुःखाचा डोंगर आजचा दिवस अग्रवाल कुटुंबासाठी दुहेरी भावनांचा आणि अत्यंत कठीण आहे. एका बाजूला घरातील तरुण मुलाच्या मृत्यूला एक महिना पूर्ण झाला आहे, तर दुसरीकडे आजच त्यांच्या आजोबांचा वाढदिवस आहे. याविषयी अत्यंत जड अंतःकरणाने बोलताना संजना म्हणाल्या, “आज माझ्या आजोबांचा वाढदिवस आहे, पण आमच्या घरात कसलाही आनंद उरलेला नाही. गेल्या एका महिन्यापासून आमचे संपूर्ण कुटुंब या प्रचंड दुःखाच्या छायेत जगत आहे. घरातील तरुण मुलाचा असा अचानक अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोज त्याच वेदनांना सामोरे जावे लागत आहे. आता हे दुःख आमच्या कुटुंबाला आणखी सहन होत नाहीये.” त्वरित न्याय मिळण्याची मागणी केतन अग्रवाल यांच्या हत्येने संपूर्ण पुणे शहरात मोठी खळबळ उडवून दिली होती. आता या घटनेला एक महिना उलटून गेल्यानंतरही कुटुंबातील आक्रोश आणि डोळ्यांतील अश्रू शांत झालेले नाहीत. संजना अग्रवाल यांनी दगडूशेठ गणपतीच्या दरबारात आपली व्यथा मांडत, प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणेने या प्रकरणाचा वेगाने तपास करून दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. ‘आमच्या कुटुंबाचा आणखी अंत न पाहता आम्हाला त्वरित न्याय द्यावा’, अशी आर्त हाक संजना यांनी दिली असून, त्यांच्या या भावुक आवाहनाने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. संबंधित बातमी वाचा.. केतन अग्रवाल खून प्रकरणाला एक महिना:’रील लाइफ’मधील प्रेम ते ‘रिअल लाइफ’मधील खुनाचा कट; कुठं घडलं, कुठं बिघडलं? “माझ्या हृदयाला घर मिळाले…” साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचा रोमँटिक डान्सचा व्हिडिओ शेअर करताना दिलेले हे कॅप्शन. हसरे चेहरे, प्री-वेडिंग शूटची स्वप्ने आणि एक ‘परफेक्ट कपल’ असल्याचा सार्वजनिक देखावा. पण याच आभासी जगाच्या पडद्यामागे प्रत्यक्ष आयुष्यात एक भयानक आणि क्रूर कट शिजत होता. ज्याच्यासोबत आयुष्य काढण्याच्या आणाभाका घेतल्या, त्याच तरुणाला कायमचे संपवण्याची तयारी सुरू होती. पुण्यातील तरुण उद्योजक केतन अग्रवाल याच्या लोहगडावरील कथित हत्याकांडाला (18 जून) एक महिना पूर्ण होत आहे. हे प्रकरण केवळ एक ‘गुन्हा’ नाही, तर आजच्या तरुण पिढीची मानसिकता, ‘सोशल मीडिया’वरील खोटा देखावा, ‘लोग क्या कहेंगे’चा दबाव आणि डिजिटल युगातील तांत्रिक तपासाचे एक ज्वलंत उदाहरण बनले आहे. एका महिन्यानंतर या प्रकरणाने समाजासमोर अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उभे केले आहेत. सविस्तर वाचा
Source link
'माझ्या भावाला लवकर न्याय मिळू दे':केतन अग्रवालच्या बहिणीची दगडूशेठ गणपतीसमोर भावनिक प्रार्थना