![]()
अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजिता महापात्र यांना नुकताच निरोप देण्यात आला, तर नवनियुक्त सीईओ सत्यम गांधी यांचे स्वागत करण्यात आले. महापात्र यांची सांगली-मीरज-कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात हा निरोप आणि स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना संजिता महापात्र भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, “आतापर्यंतच्या प्रशासकीय प्रवासात अनेक जिल्हे आले, पण अमरावतीने दिलेले प्रेम आणि इथल्या ग्रामीण जनतेसाठी काम करताना मिळालेले समाधान शब्दांत मांडता येणार नाही.” या समारंभाला संजिता महापात्र यांचे वडील सक्तीपाडा महापात्र, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ विनय ठमके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्वेता पवार, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता धावडे, लघुसिंचनचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव, महिला व बालविकास विभागाचे डेप्युटी सीईओ विलास मरसाळे, शिक्षणाधिकारी सतिश मुगल आदी मान्यवर उपस्थित होते. सहकारी अधिकाऱ्यांनी महापात्र यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, महापात्र यांनी आपल्या कार्यकाळात जिल्हा परिषदेला एका वेगळ्या उंचीवर नेले. शिक्षण, आरोग्य आणि विशेषतः महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण योजनांमुळे अमरावती जिल्ह्याची राज्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम उल्लेखनीय होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी केले. त्यांनी महापात्र यांच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रकाश टाकला आणि नवनियुक्त सीईओंचे स्वागत केले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन सीईओंचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर घाटे यांनी केले. उपस्थितांनी महापात्र यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त सीईओ सत्यम गांधी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “संजिता महापात्र यांनी अमरावती जिल्हा परिषदेच्या विकासाचा जो उच्चांक प्रस्थापित केला आहे, तो कायम राखण्याचे आणि पुढे नेण्याचे मोठे आव्हान माझ्यासमोर आहे. या पदभारामुळे माझी जबाबदारी निश्चितच वाढली असून, पारदर्शक प्रशासन आणि विकासकामांना गती देणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल.”
Source link
संजिता महापात्र यांना निरोप, सत्यम गांधींचे स्वागत:अरावती जि.प. मध्ये जुन्या-नव्या सीईओंच्या आदरातिथ्याचा सोहळा संपन्न