Headlines

पुणे जिल्ह्यात 84 बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब:दत्तक प्रक्रियेतील सर्वाधिक प्रकरणांना अंतिम मंजुरी, जिल्हा प्रशासनाची कामगिरी




पुणे जिल्ह्यात दत्तक प्रक्रियेतील 84 प्रकरणांना अंतिम मंजुरी मिळाली आहे. यामुळे 84 बालकांना कायदेशीररित्या नवीन कुटुंबे मिळाली असून, अनेक पालकांची प्रतीक्षा संपली आहे. ही प्रक्रिया जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, पुणे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली. केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या दत्तक विधान अधिनियम 2022 नुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दत्तक प्रक्रिया आता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. यापूर्वी ही प्रक्रिया जिल्हा न्यायाधीशांकडे होत होती. या निर्देशानुसार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील देशांतर्गत व देशाबाहेरील न्यायालयात प्रलंबित असलेले तसेच कार्यालय स्तरावर उपलब्ध असलेले एकूण 84 दत्तक प्रकरणांवर निर्णय घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांच्या मान्यतेने या सर्व 84 प्रकरणांना अंतिम मंजुरी देण्यात आली. या मंजुरीमुळे पालक होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या अनेक जोडप्यांना कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्यांचे हक्काचे बालक मिळाले आहे. यामुळे त्यांच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत राज्य दत्तक स्रोत संस्था आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाने ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण पुणे येथील कर्मचारी रेखा यादव, प्रथम शेंडे आणि विशेष दत्तक संस्था पुणे येथील समाजसेवक यांच्या सहकार्याने दत्तक प्रक्रियेचे कामकाज पूर्ण केले. या संपूर्ण प्रक्रियेत पुणे जिल्ह्यातील सर्व विशेष दत्तक संस्थांनी देखील मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात दत्तक आदेश जारी करणे शक्य झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *