![]()
भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात गुन्ह्यांची मालिका सुरूच असून मंगळवारी त्याच्या पोलिस कोठडीत चौथ्यांदा वाढ झालेली असतानाच आता या बहुचर्चित प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) एन्ट्री झाली आहे. ‘ईडी’ च्या विशेष १३ सदस्यीय पथकाने खरातचे नाशिकमधील निवासस्थान, सिन्नर (मिरगाव) येथील कार्यालये आणि पुण्यातील त्याच्या सीएच्या (सनदी लेखापाल) ठिकाणांवर सोमवार व मंगळवार असे दोन दिवस छापे टाकले आहेत. या कारवाईत दोन गोण्या भरून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून यात अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांचे ‘कनेक्शन’ उघडकीस आले आहे. या अधिकाऱ्यांची ईडी स्वतंत्र चौकशी करणार असून त्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. खरातच्या नाशकातील कर्मयोगीनगरमधील ‘तृप्तबाला’ या बंगल्यात तब्बल १५ तासांच्या झडतीत जप्त केलेल्या दोन गोण्या कागदपत्रांची सध्या पथकाकडून कसून तपासणी सुरू आहे. प्राथमिक माहितीतून या कागदपत्रांमध्ये नाशिकसह पाथर्डी आणि गौळाणे शिवार परिसरातील मोक्याच्या भूखंडांच्या खरेदी-विक्रीचे आणि मालकीचे दस्तऐवज सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे खरातशी संबंधित अनेक मालमत्ता आणि भूखंड हे काही बड्या शासकीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे असल्याचे समोर आले आहे. काळ्या पैशांची गुंतवणूक करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी खरातच्या माध्यमातून नातेवाइकांच्या नावे जमिनी घेतल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. यात केवळ नाशिकच नव्हे, तर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक मोक्याच्या जागांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना ईडीच्या नोटिसा जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये ज्या शासकीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे निष्पन्न झाली आहेत, त्यांची संपूर्ण माहिती ईडीने संकलित केली आहे. आता थेट या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनाच ईडीकडून लवकरच स्वतंत्र नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत आणि या जमिनींच्या खरेदीतील आर्थिक व्यवहार याबाबत ईडीकडून त्यांची सखोल चौकशी होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यामध्ये मुंबईत नियुक्त असलेल्या दोन अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी, जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे. खरात चौथ्या गुन्ह्यात १८ पर्यंत पोलिस कोठडीत कौटुंबिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी तोडगा मिळावा म्हणून सल्ला विचारण्यासाठी गेलेल्या विवाहितेला तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यास देत, पेढा खाऊ घालत मंत्रोच्चार करण्यास सांगत गुंगी आल्यानंतर शारीरिक संबंध करण्यास भाग पाडण्याच्या चौथ्या गुन्ह्यात भोंदू खरातला एसआयटीच्या पथकाने सोमवारी अटक केली होती. मंगळवारी पाच दिवस म्हणजेच १८ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. गुन्हा रजिस्टर नंबर ७८/२६ भारतीय न्याय संहिता बलात्कार आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल चौथ्या गुन्ह्यात त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
Source link
भोंदू खरातच्या मालमत्तांची 2 गोण्या कागदपत्रे जप्त:ईडीचा फास, अधिकाऱ्यांना नाेटिसा, स्वतंत्र चाैकशीही