![]()
येत्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा बोलता, लिहिता येणे सक्तीचे करण्यात आले आहे. मराठी लिहिता-वाचता येणार नाही त्यांचे परवाने थेट रद्द होतील, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. मराठी सक्तीचा नियम यापूर्वीही होता. पण चालकाला समज देऊन सोडून दिले जात होते. भाषा सक्तीसाठी परवाना रद्दचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील कर्नाटक, तामिळनाडूनंतरचे तिसरे राज्य ठरेल. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक (आरटीओ) कार्यालये विशेष तपासणी मोहीम राबवतील. छत्रपती संभाजीनगर मुंबई महानगर क्षेत्र, नागपूर आदी शहरांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. उद्धव ठाकरेंच्या ‘अस्मिते’ला एकनाथ शिंदेंकडून ‘चेकमेट’ करण्याचा प्रयत्न मराठी भाषा सक्तीचा हा निर्णय निव्वळ प्रशासकीय नाही, तर यात उद्धवसेनेचा ‘मराठी अस्मिता’ कार्ड हायजॅक करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मास्टरस्ट्रोक खेळी आहे. “खरी शिवसेना तीच, जी मराठी माणसासाठी प्रत्यक्ष कृती करते,’ हे शिंदेसेनेने या निर्णयातून ठणकावून सांगितल्याचे दिसत आहे. राज्यात रिक्षांचा आकडा १३ लाखांपार; परप्रांतीयांची मुजोरी रोखण्यासाठी मोहीम महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ नुसार १ जानेवारी २०२५ रोजी राज्यात १२,२२,८४० रिक्षा होत्या. १ जानेवारी २०२६ पर्यंत हा आकडा १२,९६,४३० वर पोहोचला, तर टॅक्सी ७७ लाख आहेत. रिक्षा संख्येत सुमारे ६ टक्के वाढ महाराष्ट्रात रोजगारासाठी येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्याकडे अंगुलीनिर्देश करते. बहुतांश परप्रांतीय मराठी भाषिकांशी मुजोरी करतात, अशा तक्रारी आहेत. त्यांना चाप बसवण्यासाठीच परवाना रद्दची मोहीम आहे. कायदा १९८८ चा, अंमलबजावणी ३७ वर्षांनी परवाना रद्दचा कायदा आहे का?
-महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम २४ आणि २७ (४) नुसार, रिक्षा, टॅक्सी, बस चालवण्याच्या परवान्यासाठी मराठीचे ज्ञान असणे बंधनकारक आहे. ‘मोटार वाहन कायदा १९८८’ च्या कलम ८६ नुसार आरटीओला परवाना निलंबन किंवा रद्दचा अधिकार आहे. त्याची अंमलबजावणी आता ३७ वर्षांनंतर होईल असे दिसते.
परीक्षा लेखी की तोंडी?
-आरटीओ निरीक्षक चालकाला मराठी समजते की नाही याची तोंडी प्रश्न विचारूनच खातरजमा करतील. जुन्या चालकांची लेखी, तोंडी परीक्षा घेण्याचे निर्देश नाहीत, परंतु नव्या परवान्यासाठी ही प्रक्रिया कडक केली जाणार आहे.
आतापर्यंत परीक्षा कशी होती?
-परवान्यासाठी अर्ज करणाऱ्याला निरीक्षक मराठीत प्रश्न विचारत किंवा रस्ते चिन्हांचे फलक वाचायला सांगतात. दहावीत मराठी विषय पास असलेल्यांना बऱ्याच वेळा सवलत मिळते. कारण त्यांचे १० वीपास प्रमाणपत्र भाषेच्या ज्ञानाचा पुरावा मानले जाते.
जुन्यांना मराठी येत नसेल तर?
जुना परवाना असलेल्यांना मराठीत येत नसल्यास आधी ‘कारण दाखवा’ नोटीस बजावली जाऊ शकते. ठरावीक मुदतीत तो मराठी शिकला नाही तर आता नव्या निर्णयानुसार परवाना रद्द होऊ शकतो.
केवळ १५ दिवसांत लाखो चालकांची परीक्षा घेणे शक्य आहे?
तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. १ मेपासूनची मोहीम प्रामुख्याने ‘जागरूकता’ आणि नवीन परवाना वितरणावर लक्ष केंद्रित करेल. आरटीओ कार्यालयांना केवळ कडक अंमलबजावणीचे आदेश आहेत.
Source link
आता असेल ‘मराठी’ बाणा तरच मिळणार रिक्षा-टॅक्सीचा परवाना:1 मेपासून रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी सक्ती, असा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील तिसरे राज्य