Headlines

विरोधकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी!:दिल्लीतील आंदोलकांवरील लाठीचार्जवरून प्रकाश आंबेडकरांची भाजप आणि काँग्रेसवर घणाघाती टीका




दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि आंदोलकांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. लोकशाहीत उत्तरदायित्वाची मागणी, संवाद आणि शांततापूर्ण आंदोलन हीच खरी लोकशाहीची ओळख असल्याचे सांगत, आंदोलकांचा आवाज दडपणे म्हणजे हुकूमशाहीचे लक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलन दडपणे म्हणजे लोकशाहीवरील आघात प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर बळाचा वापर केला जात असेल आणि मतभेद दडपण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो लोकशाही नव्हे तर हुकूमशाहीचा मार्ग आहे. त्यांनी सोनम वांगचुक यांना दिल्लीतील जंतर-मंतरवरून उपोषणादरम्यान हटविण्याच्या कारवाईचा, मध्य प्रदेशातील छतरपूर येथे केन-बेतवा नदी प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या गोंड आणि कोल आदिवासींचे आंदोलन हटविण्याचा तसेच विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा उल्लेख करत, या सर्व घटना सरकारकडून विरोधी आवाज दडपण्याच्या प्रवृत्तीचे उदाहरण असल्याचे म्हटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आठवण प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान सभेतील 25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या भाषणाचा संदर्भही दिला. त्यांच्या मते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक आणि राजकीय बदलांसाठी घटनात्मक मार्गाचा अवलंब करण्यावर भर दिला होता. त्याचबरोबर लोकशाही संस्था नागरिकांच्या प्रश्नांना आणि तक्रारींना प्रतिसाद देणाऱ्या असल्या पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. केवळ राज्यघटना अस्तित्वात असून चालत नाही, तर सत्ताधाऱ्यांनी तिच्या मूल्यांचा आणि भावनेचाही आदर केला पाहिजे, असे बाबासाहेबांचे मत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही लोकशाहीची मूलतत्त्वे प्रकाश आंबेडकर यांनी पुढे म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. सत्तेला प्रश्न विचारणे, उत्तरदायित्वाची मागणी करणे आणि शांततेच्या मार्गाने मतभेद व्यक्त करणे हा प्रत्येक नागरिकाचा लोकशाहीतील मूलभूत अधिकार आहे. लोकशाहीची खरी परीक्षा सहमतीमध्ये नसून मतभेदांना सरकार कशा पद्धतीने प्रतिसाद देते, यावर ठरत असते, असेही त्यांनी म्हटले. विरोधी आवाज दडपल्याने सत्ताधाऱ्यांचेच नुकसान आपल्या पोस्टच्या शेवटी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर टीका केली. त्यांनी म्हटले की, यापूर्वी काँग्रेस सरकारांनी आणि आता भाजप सरकारनेही विरोधी मतांना मर्यादित करण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रिटिश राजवटीप्रमाणे मतभेद दडपण्याची भूमिका स्वीकारल्याने सत्ताधाऱ्यांना दीर्घकाळ फायदा होत नाही. इतिहासाने वारंवार दाखवून दिले आहे की, लोकशाहीतील प्रश्न दडपल्याने सरकार मजबूत होत नाही, उलट जनतेचा विरोध अधिक तीव्र होतो आणि हुकूमशाही प्रवृत्ती अखेरीस सत्ताधाऱ्यांनाच महागात पडतात, असा दावा त्यांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *