![]()
औंढा नागनाथ तालुक्यात रात्रीचे भारनियमन रद्द करावे यासह इतर मागण्यांसाठी ठाकरे गटाच्या वतीने औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर रामेश्वर येथे सोमवारी ता. 20 दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे वसमत, औंढा नागनाथ ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. त्यानंतर प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर, साळणा आणि रुपर या 33 केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वीज पुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पेरणीनंतरच्या काळात पिकांना पाणी देणे गरजेचे असताना वीज नसल्यामुळे उभे पीक वाळून जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. औंढा नागनाथ तालुक्यात रात्रीचे भारनियमन रद्द करावे, स्मार्ट मीटर बसवण्याचे काम तातडीने थांबवावे. रामेश्वर, साळणा, रुपर उपकेंद्रातील सर्व फिडरची दुरुस्तीची कामे त्वरित करावीत. उंडेगाव फिडरवरील कर्मचाऱ्याची तातडीने बदली करावी, वाऱ्यामुळे व पावसामुळे शेतात पडलेले पोल तसेच विजेचे तारांची दुरुस्ती करावी, सर्व स्वतंत्र गावठाण फिडर त्वरित चालू करावेत, नांदखेडा येथील तुटलेल्या विजेच्या तारा त्वरित चालू करून द्याव्यात या मागणीसाठी सोमवारी रामेश्वर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे, शेतकरी सेनेचे प्रदेश पदाधिकारी वसीम देशमुख, बबनराव इघारे, अशोक डव्हळे, माऊली मगर, भास्करराव इघारे, बाळासाहेब गारकर, तानाजी मोरे, बाळासाहेब देवकर, विक्रम मोरे, उत्तम मांडे, शेकुजी गारकर, गजानन मगर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी आकरा वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिस प्रशासन व तहसील प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले.
Source link
भारनियमन रद्द करा म्हणत ठाकरे गटाचा रास्तारोको:रामेश्वरातील आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतूक ठप्प