Headlines

अंगणवाडी पोषण आहारात बदल; बालकांना आता शाकाहारी पुलाव:पुण्यातील 4,395 अंगणवाड्यांमधील लाभार्थ्यांना मिळणार लाभ




पुणे जिल्ह्यात अंगणवाडीतील पोषण आहारात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना अधिक पौष्टिक, रुचकर व दर्जेदार आहार मिळावा यासाठी आता शाकाहारी पुलाव आणि बहुधान्य पौष्टिक पफचा समावेश करण्यात आला आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २०२६ पासून सुधारित पाककृतींचा पुरवठा केला जाईल. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे यांनी ही माहिती दिली. महिला व बालविकास विभागाने घरपोच पोषण आहार योजनेत हे बदल केले आहेत. पौष्टिक मूगडाळ खिचडी प्रीमिक्स कायम ठेवण्यात आले असून, त्यासोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकीट दिले जाईल. पौष्टिक तूरडाळ खिचडी प्रीमिक्सऐवजी आता व्हेज पुलाव उपलब्ध होईल. तसेच, भरडधान्ययुक्त बहुधान्य-प्रथिन मिश्रणाऐवजी बहुधान्य पौष्टिक पफचा समावेश करण्यात आला आहे. या बदलांमागे लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक, रुचकर आणि स्वीकारार्ह आहार उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. बालके, गरोदर महिला आणि स्तनदा माता आहार आवडीने खावेत, यासाठी व्हेज पुलाव आणि बहुधान्य पौष्टिक पफ यांचा समावेश करण्यात आला आहे. महिला व बालविकास समितीच्या सभापती अंकिता पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण भागात ४ हजार ३९५ अंगणवाड्या कार्यरत आहेत. या केंद्रांमार्फत जवळपास १ लाख ६ हजार बालके, तसेच गरोदर महिला आणि स्तनदा माता यांना घरपोच पोषण आहाराचा लाभ दिला जातो. नोव्हेंबर व डिसेंबर-२०२६ महिन्यापासून सुधारित घरपोच पोषण आहाराचा पुरवठा केला जाणार आहे. लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक व चविष्ट आहार मिळावा, या उद्देशाने व्हेज पुलाव, मल्टीग्रेन न्युट्री पफ आणि स्वतंत्र मसाला पाकिटाचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये या सुधारित ‘खाद्यसूची’नुसार पुरवठा सुनिश्चित केला जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *