![]()
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या यूडायस प्लसच्या अहवालातून महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण व्यवस्थेचे अत्यंत विदारक वास्तव समोर आले आहे. डिजिटल इंडिया आणि प्रगत शिक्षणाचा गाजावाजा होत असताना, महाराष्ट्रात आजही ९,२६९ शाळा एकशिक्षकी असून तब्बल २९ विद्यार्थ्यांना १ शिक्षक अध्यापन करत आहे. अशी स्थिती देशातील एकूण १,००,८४३ शाळांची असून जवळपास १० टक्के शाळा एकट्या महाराष्ट्रात आहेत. अपूरा निधी तसेच सुखसूविधांचा वानवा यामुळे शासकीय तसेच अनुदानित शाळांना घरघर लागली आहे. शाळा बंद होण्यात देशात महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर एक शिक्षकी शाळेच्या समस्येबरोबरच दुसरीकडे राज्यातील शाळा बंद होण्याचे सत्र सुरूच आहे. गतवर्षी (२०२४-२५) राज्यात १ लाख ८ हजार २५० शाळा होत्या. त्या यंदा घटून १ लाख ८ हजार १३९ वर आल्या आहेत. म्हणजेच वर्षभरात १११ शाळा कायमच्या बंद झाल्या आहेत. सरासरी दर तीन दिवसांनी राज्यातील एक शाळा बंद होत आहे. शाळा बंद होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्र देशात नवव्या क्रमांकावर आहे. २४ विद्यार्थ्यामागे १ शिक्षक देशात एका शाळेत सरासरी १६९ विद्यार्थी आहेत. राज्यात एका शाळेत हा भार सरासरी २०० विद्यार्थ्यांवर जातो. शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तराच्या बाबतीतही राज्य राष्ट्रीय सरासरीच्या मागे गेले आहे. देशात सरासरी २४ विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक उपलब्ध आहे. राज्यात हेच प्रमाण २९ मागे १ असे आहे. यावरून ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेशी कसा खेळ मांडला जातो, हे स्पष्ट होते. राज्याच्या शिक्षण क्षेत्राचा ताळेबंद
राज्यातील एकूण एकशिक्षकी शाळा९,२६९
एकाच शिक्षकाकडून सर्व विषय शिकणारे एकूण विद्यार्थी२,६८,८०१
वर्षभरात बंद पडलेल्या शाळा (१,०८,२५० वरून संख्या १,०८,१३९ वर) १११
यंदा वाढलेली एकूण विद्यार्थी संख्या३,६०,०००+
राज्यातील एकूण विद्यार्थी संख्या २,१६,३२,६६९
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी२,३१,७२५
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील द्विशिक्षकी शाळा १२७ एक्स्पर्ट व्ह्यू
विद्यार्थी संख्येवर आधारित धोरणाचा मोठा परिणाम
ही माहिती काही ठराविक निकषांवर आधारित असते. मात्र, प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तव खूप वेगळे आहे. पूर्वी एकशिक्षकी शाळा लक्षात घेऊन द्विशिक्षकी शाळांची घोषणा झाली होती. मात्र, जिथे दोन शिक्षक आहेत, तिथल्या एका शिक्षकाला जवळच्या दुसऱ्या शाळेचा अतिरिक्त कारभार दिला जातो. आता तुकडीऐवजी केवळ विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षक संख्या ठरवली जाते. याचा परिणाम असा झाला की काही ठिकाणी शिक्षकच नाहीत. या चुकीच्या धोरणामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत.
– महेंद्र गणपुले (शिक्षणतज्ज्ञ) जिल्ह्यात १२७ द्विशिक्षकी शाळा
संभाजीनगर जिल्ह्यात १२७ द्विशिक्षकी शाळा आहेत. मात्र, कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमधील शिक्षकांना जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये तात्पुरते पाठवले जाते. त्यामुळे दोन शिक्षक असलेल्या या शाळा कागदावर द्विशिक्षकी असल्या, तरी प्रत्यक्षात त्या पुन्हा एकशिक्षकीच ठरत आहेत. शिक्षणात महिला शिक्षकांचे प्रमाण अधिक
महाराष्ट्रातील एकूण ७ लाख ५० हजार २७२ शिक्षकांपैकी ४,००,२३३ महिला शिक्षिका आहेत. पुरुष शिक्षकांची संख्या ३,५०,०३९ आहे. म्हणजेच राज्यात पुरुषांपेक्षा ५० हजारांहून अधिक महिला शिक्षिका ज्ञानदानाचे पवित्र काम अत्यंत सक्षमपणे सांभाळत आहेत. यूडायस प्लस २०२५-२६ च्या अहवालात शिक्षणाची स्थिती उघड
राज्यात पटसंख्या वाढते आहे. विद्यार्थ्यांची ओढ वाढते आहे. गेल्या वर्षाच्या (२,१२,७२,६११) तुलनेत यंदा ३ लाख ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची भर पडली आहे. एकूण विद्यार्थी संख्या २,१६,३२,६६९ वर गेली आहे. मात्र, त्या प्रमाणात शिक्षकांची भरती न झाल्याने विद्यमान शाळा आणि कार्यरत शिक्षकांवर प्रचंड ताण येत आहे.
Source link
शासकीय, अनुदानीत शाळांनाही लागली घरघर:राज्यात तब्बल 9,269 शाळा 1 शिक्षकी; एका वर्षात 111 शाळांना लागले कुलूप