![]()
मलबार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राष्ट्रीय सीएसआर प्लॅन २०२६-२७ चा शुभारंभ करण्यात आला. या अंतर्गत देशभरातील ३३ हजार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, देशात प्रचंड पैसा असला तरी तो समाजासाठी खर्च करणारे कमी आहेत, असे मत व्यक्त केले. हा शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मलबार गोल्ड अँड डायमंड्सचे मोहम्मद अन्वर, मुख्याध्यापक सतीश हाके, इस्माईल सय्यद, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, सुनील पांडे, ऍड. मिताली सावळेकर यांच्यासह १२ महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री पाटील यांनी सांगितले की, मलबार समूहाच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त देशभरातील ३३ हजार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिली जात आहे. पुणे विभागातील ७४६ विद्यार्थिनींना ६० लाख ९६ हजार रुपयांची शिष्यवृत्ती वितरित केली जाईल. महिलांची भूमिका समाज आणि कुटुंबासाठी महत्त्वाची असून, त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आणि त्यांना सन्मानाने रोजगाराच्या संधी मिळणे आवश्यक आहे, असेही पाटील म्हणाले. मलबार गोल्ड अँड डायमंड्सचे प्रादेशिक प्रमुख फन्झीम अहमद यांनी माहिती दिली की, सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात देशभरातील सीएसआर उपक्रमांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. यापैकी महाराष्ट्रासाठी १०.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, सुमारे १.८ कोटी रुपये शिष्यवृत्ती उपक्रमासाठी खर्च केले जातील. अहमद यांनी पुढे सांगितले की, ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रमांतर्गत देशभरातील १ लाख ३२ हजारांहून अधिक गरजूंना अन्नदान केले जात आहे. तसेच, २ हजार मायक्रो लर्निंग सेंटर्सच्या माध्यमातून सुमारे १ लाख विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे आणि पाच वृद्धाश्रमांद्वारे निराधार ज्येष्ठ नागरिकांची सेवा केली जात आहे. पुण्यातील ९ आणि महाराष्ट्रातील ३४ दालनांमधून मिळणाऱ्या नफ्यातील सीएसआर निधी स्थानिक सामाजिक उपक्रमांवरच खर्च केला जात आहे. समाजाच्या गरजांनुसार विविध विकासात्मक उपक्रम सातत्याने राबवले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Source link
मलबार ट्रस्टतर्फे 33 हजार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती जाहीर:मंत्री चंद्रकांत पाटील: देशात पैसा खूप, समाजासाठी खर्च करणारे कमी