![]()
राज्यात यंदा सर्वत्र झालेल्या दमदार पावसामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढला असून, 21 जुलै 2026 पर्यंत डेंग्यूचे 3,762 तर हिवतापाचे 2,036 रुग्ण आढळून आले आहेत. ही वाढती रुग्णसंख्या आणि साथ आजारांचा संभाव्य उद्रेक लक्षात घेऊन आरोग्य विभागाने सतर्क होत तातडीने पावले उचलली आहेत. ज्याअंतर्गत ताप सर्वेक्षण, रक्तनमुन्यांची तपासणी, प्रभावी कीटकनाशक फवारणी आणि व्यापक जनजागृती अभियानावर विशेष भर देत या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, यंदा 21 जुलैपर्यंत राज्यात डेंग्यू आणि चिकुनगुन्याच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संशयित रुग्णांची व्यापक पातळीवर तपासणी करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत डेंग्यूसाठी तपासण्यात आलेल्या 48 हजार 342 रक्तनमुन्यांपैकी 3,762 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर चिकुनगुन्यासाठी तपासलेल्या 23 हजार 111 नमुन्यांमधून 784 जणांना या आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, सध्या या सर्व रुग्णांवर योग्य ते वैद्यकीय उपचार सुरू आहेत. हिवतापाचे एकूण 2036 रुग्ण राज्यात हिवतापावर (मलेरिया) नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले असून, अतिसंवेदनशील आणि उद्रेकग्रस्त गावांमध्ये घरोघरी जाऊन कीटकनाशकांची फवारणी, ताप असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण आणि त्यांच्यावर तातडीने औषधोपचार करण्यावर भर दिला जात आहे. ताज्या आकडेवारीनुसार, यंदा 21 जुलैपर्यंत राज्यात हिवतापाचे एकूण 2036 रुग्ण आढळून आले आहेत. ज्यापैकी 546 रुग्ण हे राज्याबाहेरून आलेले आहेत. राज्याने 2030 सालापर्यंत हिवतापाचे संपूर्ण निर्मूलन करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, त्या दिशेने प्रशासनाकडून युद्धपातळीवर विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. उघड्यावर पाणी साचू देऊ नये दुसरीकडे, डेंग्यू आणि चिकुनगुन्यासारख्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठीही प्रभावी पावले उचलली जात आहेत. याअंतर्गत संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठवणे, साथ असलेल्या भागात धूर फवारणी करणे, साठवलेल्या पाण्यात ‘टेमिफॉस’चा वापर आणि कायमस्वरूपी पाणीसाठ्यांमध्ये डास अळ्या खाणारे गप्पी मासे सोडणे यांसारख्या उपाययोजनांसह नागरिकांमध्ये डासांची उत्पत्ती रोखण्याबाबत व्यापक जनजागृती केली जात आहे. वाढता धोका लक्षात घेता, नागरिकांनी आपले घर आणि परिसरात कुठेही उघड्यावर पाणी साचू देऊ नये, तापाची प्राथमिक लक्षणे दिसताच तातडीने जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे महत्त्वपूर्ण आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
Source link
राज्यात साथीच्या आजारांचा विळखा!:डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, डेंग्यूचे 3 हजार 762 रुग्ण पॉझिटिव्ह