Headlines

टाळ-मृदंगाचा निनाद अन् नामघोषाने कोपरगाव विठ्ठलमय:संत ज्ञानेश्वर स्कूलच्या विद्यार्थ्यांची बालदिंडी




वारकरी पोशाख, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात उंच डोलणाऱ्या भगव्या पताका, टाळांचा गजर आणि लेझीमच्या निनादात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोपरगाव शहरातून विठ्ठल-नामाचा जयघोष करत दिंडी काढली. या दिंडीच्या माध्यमातून चिमुकल्यांनी संपूर्ण कोपरगावकरांना पंढरपूरच्या वारीची प्रत्यक्ष अनुभूती घडवून आणली. वारीच्या भक्ती रंगात रंगण्यासोबतच विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर फलक हाती घेऊन शहरात मोठी जनजागृतीही केली. आषाढी वारीची परंपरा आणि संस्कृती शालेय विद्यार्थ्यांना अनुभवता यावी यासाठी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. केवळ धार्मिकताच नव्हे, तर सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीपर फलक घेतले होते. यामध्ये ​”भेसळमुक्त भारत, निरोगी भारत’ ​”भेसळयुक्त अन्न टाळा, निरोगी जीवन जगायला शिका’ “जिथे विठ्ठलाचे नाम, तिथे स्वच्छतेचे धाम’ “पर्यावरणाचा समतोल राखा, वृक्ष संवर्धन ही काळाची गरज’ “पाणी आडवा, पाणी जिरवा’ अशा अनेक संदेशांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ​पालखी खांद्यावर घेऊन निघालेली ही दिंडी शहरातील सराफ बाजार येथील पवार सरकार संस्थानच्या सोमेश्वर महादेव मंदिर येथे आली. या ठिकाणी बालगोपाळांनी फुगड्या खेळत, टाळ वाजवत आणि भजन-कीर्तन करत हरिनामाचा जयजयकार केला. यावेळी सोमेश्वर महादेव देवस्थानच्यावतीने पालखीचे पूजन करून दिंडीचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच, मराठा पंच हनुमान व विठ्ठल रुख्मिणी मंदिर यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना केळी आणि साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यात मराठा पंच मंडळाचे अध्यक्ष अॅड. संजय भोकरे, कारभारी नजन, राजेंद्र शिंगी, प्रफुल्ल पांडे, सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील, सुशांत घोडके यांनी सर्व बालवारकऱ्यांचे उत्साहात स्वागत केले. या सोहळ्यात संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक सहभागी झाले होते. वारीत पर्यावरण संवर्धन अन् आरोग्याचा जागर आषाढी एकादशीच्यानिमित्ताने शुक्रवारी जिल्ह्यातील शाळांत दिंडी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सकाळीच शाळेत हजर झाले. हाती भगव्या पताका आणि जनजागृतीचे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. या विद्यार्थ्यांनी शहरातून गावातून विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी काढली. हरिनामाच्या जयघोषाबरोबरच पर्यावरण संवर्धन, निरोगी आरोग्याचाही संदेश या बाल वारकऱ्यांनी दिल्याचे दिसून आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *